Swami Vivekanand birth anniversary: स्वामी विवेकानंदांचा जन्मदिवस भारतात राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा केला जातो. धर्म, मानवता, स्वातंत्र्य, वेदान्त तत्वज्ञान या सारख्या इतर अनेक विषयांवर त्यांचे विचार नेहमीच प्रत्येक भारतीयाला मार्गदर्शक ठरतात. धर्माच्या विषयावरील त्यांच ज्ञान विशाल होतं.


स्वामी विवेकानंदांचा जन्म 12 जानेवारी 1863 मध्ये कोलकात्यात झाला. त्यांच मुळ नाव नरेंद्रनाथ दत्त होतं. त्यांचे वडील कोलकाता उच्च न्यायालयात वकील होते तर आई भूवनेश्वरी देवी या धार्मिक विचारांच्या होत्या.


1879 साली त्यांनी प्रेसीडेन्सी महाविद्यालयात प्रवेश परीक्षेत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. ईश्वराच्या शोधात असलेल्या विवेकानंदांना रामकृष्ण परमहंस हे गुरुस्थानी लाभले आणि त्यांच्या जीवनाने वेगळी दिशा घेतली. रामकृष्ण परमहंसांची आणि विवेकानंदांची भेट 1881 साली कोलकात्यातील दक्षिणेश्वर काली मंदिरात झाली. त्यावेळी परमहंसांनी विवेकानंदाना मानवतेची सेवा हीच ईश्वराची सेवा असल्याचा मंत्र दिला. या मंत्राचा जप विवेकानंदांनी पुढे आयुष्यभर केला.


Good Governance Day : 25 डिसेंबरला साजरा केला जातो सुशासन दिन, काय आहे कारण?


आपण ईश्वर पाहिलाय का?
विवेकानंदांची आणि रामकृष्णांची भेट झाल्यानंतर विवेकानंदांनी परमहंसांना एक प्रश्न विचारला, आपण ईश्वर पाहिलाय का? त्यावर परमहंसांनी उत्तर दिलं की मी तुला पाहतोय तसेच देवालाही पाहतोय, फरक एवढाच आहे की मी देवाला तुझ्यापेक्षा जास्त अनुभवतोय.


शिकागो परिषदेत भाग
शिकागो येथे 1893 साली जागतिक धर्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेच्या आयोजनाची तयारी तीन वर्षे करण्यात येत असल्याचं सांगण्यात येत होतं. विवेकानंदांनी त्यांच्या एका पत्रात असं लिहलंय की तामिळनाडूतील राजा भास्कर सेतूपती यांनी विवेकानंदांना या विश्व धर्म संमेलनात भाग घ्यावा असं सुचवलं होतं. त्यानंतर स्वामी विवेकानंद कन्याकुमारीला गेले. ते समुद्र किनाऱ्यावरुन, विवेकानंद रॉक म्हणून प्रसिध्द असलेल्या दगडापर्यंत पोहत गेले आणि तीन दिवस भारतीय धर्माच्या भूतकाळावर आणि भविष्यकाळावर चिंतन केलं.


Sardar Patel Death Anniversary: ...म्हणून त्यांना जनतेनं 'सरदार', 'लोहपुरुष' म्हटलं, वल्लभभाई पटेल यांची पुण्यतिथी


स्वामी विवेकानंद हे नाव कसं मिळालं?
नरेंद्रनाथ दत्त यांचे नाव स्वामी विवेकानंद कसं झालं याची एक मनोरंजक कथा आहे. अनेकांना वाटते की त्यांना हे नाव त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांनी दिलंय. पण विवेकानंदाच्या नावाची कथा वेगळी आहे. शिकागोच्या विश्व धर्म संमेलनात भाग घ्यायचं ठरल्यानंतर विवेकानंदांच्या समोर खर्चाचा मोठा प्रश्न होता. त्यावेळी राजपूताना परिसरातील खेतडीच्या राजाने त्यांचा हा खर्च उचलण्याची तयारी दर्शवली आणि तिथे त्यांना स्वामी विवेकानंद या नावाने भाग घ्यायचे सुचवले. विवेकानंदांनीही या नावाचा स्वीकार केला.


स्वामी विवेकानंदानी शिकागो येथे आजपासून सुमारे 11 सप्टेंबर 1893 रोजी जागतिक धर्म संमेलनात भाग घेतला. त्यांठिकाणी विवेकानंदानी धर्म आणि मानवता यावर केलेल्या ऐतिहासिक भाषणाचा आजही प्रत्येक भारतीयाला गर्व आहे. शिकागोमध्ये गेल्यानंतर विवेकानंदांनी भारतीय धर्म, मानवता आणि संस्कृतीवर दिलेल्या भाषणाने अनेकांना आश्चर्यचकीत केलं.


Smita Patil Death Anniversary | निखळ सौंदर्याची खाण अन् सशक्त अभिनयासाठी प्रसिद्ध असलेल्या स्मिता पाटील


अमेरिकेतून भारतात परतल्यानंतर विवेकानंदानी संपूर्ण देश पालथा घातला. त्यांनी भारताच्या गरीबी, गुलामी आणि जातीय व्यववस्थेचं चिंतन केलं. वेदान्त तत्वज्ञानावर त्यांनी भारतभर भाषणे दिली. विवेकानंदानी 1 मे 1897 साली कोलकाता येथे रामकृष्ण मिशनची स्थापना केली. तसेच 9 डिसेंबर 1898 रोजी गंगेच्या किनारी बेलूर येथे रामकृष्ण मठाची स्थापना केली.


हिंदू धर्म आणि वेदान्त
धर्माच्या बाबतील विवेकानंदांचे विचार प्रगतीशील होते. विवेकानंद कोणत्याही धर्माचा तिरस्कार करत नव्हते. त्यांनी भारतासमोर आणि जगासमोर वेदान्त तत्वज्ञानाची मिमांसा केली ती नक्कीच धर्माचे खऱ्या अर्थाने चिंतन करते. विवेकानंद म्हणायचे की आपण वेदान्ताशिवाय श्वासही घेऊ शकणार नाही, मनुष्याच्या जीवनात जे काही घडतंय ते वेदान्ताचा प्रभावातूनच घडतंय.


विवेकानंदांच्या मते वेदान्त तत्वज्ञान हेच खऱ्या अर्थाने धर्माची शिकवण देतंय. वेगवेगळ्या धर्मातील चांगल्या गोष्टी कशा स्वीकारायच्या ते वेदान्त तत्वज्ञानामधून शिकता येतं. स्वामी विवेकानंद म्हणायचे की हिंदू धर्माचा खरा संदेश हा मनुष्याला वेगवेगळ्या संप्रदायात विभागणी करणे नसून सर्वांना मानवतेच्या एका सूत्रात बांधणे हा आहे.


विवेकानंदांना दम्याचा त्रास होता. त्यामुळे 4 जुलै 1902 साली वयाच्या अवघ्या 39 व्या वर्षी बेलूर येथील मठात त्यांचा मृत्यू झाला. बेलूर येथील गंगा नदीच्या किनाऱ्यावर त्यांचे अंतिम संस्कार करण्यात आले.


CV Raman : 'आकाश निळेच का दिसते?' या कुतुहलातून जगाला दिशा देणाऱ्या 'रामन इफेक्ट'चा शोध लावणारा महान शास्त्रज्ञ