Bird Flu कोरोनाचं संकट देशातून काढता पाय घेत नाही, तोच देशात आता बर्ड फ्लूचा फैलाव होण्यास सुरुवात झाली आहे. सुरुवातीला अवघ्या 4 राज्यांमध्ये परसलेला हा संसर्ग आता 10 राज्यांमध्ये पसरल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. एवियन इन्फ्लुएंजा अर्थात बर्ड फ्लूचा फैलाव दिल्ली आणि महाराष्ट्रातही झाल्याची बाब स्पष्ट करण्यात आली. ज्यानंतर उत्तराखंडमध्येही याचा फैलाव झाल्याची बाब निदर्शनास आली. सध्याच्या घडीला हे संकट थोपवून लावण्यासाठी केंद्र आणि स्थानिक प्रशासनाकडून महत्त्वाची पावलं उचलली जात आहेत. दरम्यान, अद्यापही मानवामध्ये या विषाणूचा संसर्ग झाल्याची कोणतीही घटना समोर न आल्यामुळं अंडी आणि चिकन खाण्यावर, विक्रीवर शासनाकडून कोणत्याही प्रकारचे निर्बंध आणण्यात आलेले नाहीत.


देशात कुठवर पसरला आहे बर्ड फ्लू?


आतापर्यंत केरळ, राजस्थान, मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, दिल्ली, उत्तराखंड आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याच्या माहितीवर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. महाराष्ट्रात परभणी, मुंबई, दापोली अशा विविध भागांमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याचं कळत आहे.


पंतप्रधान मोदी म्हणतात, सावध व्हा!


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात पसरणाऱ्या बर्ड फ्लूचा आढावा घेत नागरिकांना सावध राहण्याचं आवाहन केलं आहे. शिवाय स्थानिक जलस्त्रोतांच्या आजुबाजूला, प्राणसंग्रहालयात आणि कुक्कुटपालन केंद्रांतील परिस्थितीचा आढाव घेत इथं काटेकोरपणे नजर ठेवण्यावर जोर दिला. वन विभाग, आरोग्य विभाग आणि पशुपालन विभाग यांच्यातील जास्तीत जास्त समन्वय हे संकट थोपवून लावण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.


कुक्कुटपालन व्यावसायिकांमध्ये भीती


दरम्यान, या रोगाचं देशावर सावट असतानाच कुक्कुट पालन व्यवसायात असणाऱ्यांना धडकी भरली आहे. पण, हीच भीती दूर करत चांगल्या पद्धतीनं उकडलेली अंडी, शिजवलेलं चिकन खाण्यात कोणताही धोका नाही, कारण हा विषाणू उच्च तापमानामध्ये नष्ट होतो ही बाबही अधोरेखित केली. लोकांनी घाबरून न जाता कुठंही पक्षी मृतावस्थेत आढळल्यास मात्र प्रशासनाला याबाबतची माहिती द्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे.


...म्हणून यंदाचा अर्थसंकल्प छापला जाणार नाही!


मुंबई महानगरपालिकेकडून नागरिकांना आवाहन


मुंबईत मृतावस्थेत आढळलेल्या कावळ्यांच्या चाचणी अहवालातून बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याची बाब स्पष्ट झाली. त्यानंतर सतर्क होत प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या. यामध्ये पक्षी कुठंही मृतावस्थेत आढळल्यास नागरिकांनी 1916 या क्रमांकावर संपर्क साधत याबाबतची माहिती देण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे.



ठाण्यातही नियंत्रण कक्ष

भोपाळ येथील एनआयएचएसएडी येथे महाराष्ट्रातून एव्हीयन इन्फ्लूएन्झा चाचणीसाठी प्राप्त नमुन्यांचा प्रयोग शाळेतून प्राथमिक निकाल समोर आला असून ठाण्यातील ३ पाण बगळे आणि १ पोपट बर्ड फ्लू पॉझिटिव्ह आल्याचा अहवालात स्पष्ट झाले आहे. या बाबत अद्याप मात्र ठाणे महापालिकेकडे याचा अहवाल आला नसल्याचे पालिका अधिकारी यांनी सांगितलं. तर दुसरीकडे पालिकेच्या वतीनं बर्ड फ्लूमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होवू नये तसेच नागरिकांना योग्य माहिती मिळावी यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलं आहे. नागरिकांनी मृत पक्ष्यांची माहिती मिळताच तात्काळ नियत्रंण कक्षाला कळविण्याचे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे. ठाणे महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या निगरानीखाली हा नियंत्रण स्थापन केला असून नागरिकांनी प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष येथील टोल फ़्री -1800 222 108 तसेच 022 -25371010 या हेल्पलाईनवर माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.