National Voters Day 2024 : आज राष्ट्रीय मतदार दिन (National Voters Day).लोकशाहीत मतदानाच्या अधिकाराचं महत्त्व नेमकं काय? तसेच हा हक्क बजावल्याने समाजात काय परिणाम होऊ शकतो? मतदारांची भूमिका नेमकी कोणती असावी? याबद्दल नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. जगातली सर्वात मोठी लोकशाही अशी ओळख असलेल्या भारताची लोकशाही व्यवस्था टिकवण्यासाठी मतदान कसं महत्त्वाचं आहे? हे या दिनाच्या निमित्ताने सांगितलं जातं.
स्वातंत्र्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी देशात संविधान लागू झाले. भारतात, 18 वर्षानंतर, प्रत्येक वयोगटातील आणि लिंगाच्या लोकांना मतदानाचा अधिकार आहे. नागरिकांनी आपल्या मताचा योग्य प्रकारे वापर केला तर योग्य प्रतिनिधी निवडून येऊ शकतात आणि त्या माध्यमातून लोकशाही बळकट होऊ शकते. मतदानाच्या हक्काचा वापर करत देशातील नागरिक त्यांच्या भविष्यासाठी योग्य अशा प्रतिनिधीची निवड करु शकतील.
राष्ट्रीय मतदार दिन कधी आहे?
2011 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभादेवी पाटील यांनी पहिल्यांदा 25 जानेवारी रोजी 'राष्ट्रीय मतदार दिन' साजरा करण्यास सुरुवात केली. त्यानुसार दरवर्षी 25 जानेवारी हा दिवस भारतात राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी सहसा विविध राजकीय पक्ष आणि केंद्र तसेच राज्य सरकारकडून अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. आपल्या देशात 18 वर्षे पूर्ण केलेल्या आणि मतदार यादीत नाव असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मत देण्याचा अधिकार आहे. धर्म, जात, वर्ण, संप्रदाय अथवा लिंग या निकषांवर भेदभाव न करता कुणालाही हा अधिकार बजावता येऊ शकतो.
मतदार दिन 25 जानेवारीलाच का साजरा केला जातो?
भारतीय संविधान 1947 मध्ये स्वातंत्र्यानंतर तीन वर्षांनी 1950 मध्ये 26 जानेवारी रोजी लागू करण्यात आले. त्याच्या एक दिवस आधी, म्हणजे 25 जानेवारी 1950 रोजी, निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली, ज्यामुळे आज भारतीय निवडणूक आयोगाच्या स्थापना दिनी राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
उमेदवारांबाबत माहिती मिळवण्याचा अधिकार
निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या प्रत्येक उमेदवाराबाबतची माहिती मिळवण्याचा अधिकार मतदारांना आहे. उमेदवाराची संपत्ती, गुन्हेगारी नोंद, शैक्षणिक पात्रता अशा संदर्भातील माहिती त्यांना मिळू शकते. उमेदवाराची शैक्षणिक पात्रता जाणून घेण्याचा अधिकार मतदारांना आहे, याबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानंही स्पष्ट केला आहे.
ज्या ठिकाणच्या मतदार यादीत मतदारांचं नाव आहे, तिथेच त्यांनी मतदान करणं अपेक्षित असतं. वास्तव्याचं ठिकाण बदलल्यास एखादा मतदार नव्या मतदाराच्या रुपात नव्या ठिकाणाहून मतदान कार्ड बनवून घेऊ शकतो. पण तत्पूर्वी त्यांनी जुन्या मतदार यादीतून नाव हटवणं अपेक्षित असतं.
महत्त्वाच्या बातम्या :