ED Questions Rahul Gandhi : नॅशनल हेराल्ड प्रकरणी (National Herald Case) राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची ईडीकडून (ED) दोन टप्प्यात साडेदहा तास चौकशी केली जाणार आहे. आज पुन्हा चौकशी होणार आहे. काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी यांची आज ईडीकडून चौकशी सुरु आहे. पण काल (सोमवारी) एकीकडे राहुल गांधींची ईडी चौकशी सुरु असतानाच देशभरात मात्र काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली. 


नॅशनल हेराल्डप्रकरणी राहुल गांधी यांची ईडीकडून दोन टप्प्यात साडेदहा तास चौकशी झाली. चौकशीनंतर राहुल गांधी ईडी कार्यालयाबाहेर पडले. राहुल गांधी यांची आज पुन्हा चौकशी होणार आहे. पहिल्या टप्प्यात तब्बल तीन तास चौकशी झाली. यात राहुल गांधींना वैयक्तिक प्रश्न विचारण्यात आल्याची माहिती मिळत आहे. दुपारी लंचब्रेकनंतर पुन्हा राहुल गांधी यांच्या चौकशीला सुरुवात झाली. दुसऱ्या टप्प्यात यंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेविषयी राहुल गाधींना प्रश्न विचारले गेल्याची माहिती आहे. 


दिल्लीत मध्यरात्री सर्वजण झोपले असताना काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची अस्वस्थता त्यांना झोपू देत नव्हती, कारण काय होणार? या चिंतेनं ते रात्री साडेअकरापर्यंत जागे राहिले. काही पोलीस ठाण्यात तर काही रस्त्यावर. सर्वांच्या नजरा ईडीच्या कार्यालयावर होत्या, जिथे राहुल गांधींची सुमारे साडेदहा तास चौकशी करण्यात आली. राहुल गांधी ईडी कार्यालयातून बाहेर पडताच काँग्रेसच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. राहुल गांधी घरी पोहोचल्यावर त्यांची बहीण प्रियांका गांधीही त्यांना भेटायला आल्या.


दरम्यान, दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या 459 काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांची सुटका केली. राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ ईडी कार्यालयावर मोर्चा काढत असताना या लोकांना ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतर हे लोक गांधीगिरीवर उतरले.


काँग्रेसचा केंद्रावर हल्लाबोल 


राहुल गांधी ईडी कार्यालयातून बाहेर पडताच केंद्र सरकारविरोधातील काही काँग्रेस नेत्यांचा राग गगनाला भिडला होता. राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी थेट पंतप्रधानांवरच हल्लाबोल केला. अशातच, नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडी पुन्हा राहुल गांधींना अनेक धारदार प्रश्न विचारणार असल्याचं वृत्त आहे. ज्यांची उत्तरं ते काल देऊ शकले नाहीत. नॅशनल हेराल्डशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणात चौकशीची तारीख, तब्बल 50 कोटी देऊन 2000 कोटींची संपत्ती हडप करण्याच्या प्रकरणाशी संबंधित प्रश्नांना सामोरे जाण्याची तारीख. त्यामुळे काँग्रेसने हा आरोप खोटा असल्याचं म्हणत, देशभरात निदर्शनं केली. 


दिल्ली, मुंबई, लखनौ, चंदीगढ, इंदूर, श्रीनगर, पाटणा, जयपूर या शहरांमध्ये काँग्रेसचे लोक रस्त्यावर उतरले. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत काँग्रेसनं गदारोळ केला. दिल्लीत काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांना दिल्ली पोलिसांनी राहुल गांधींसोबत ईडी कार्यालयापर्यंत पायी कूच करून ताब्यात घेतलं.


ईडीच्या चौकशीत राहुल गांधींना कोणते प्रश्न?



  • यंग इंडियन कंपनी स्थापन करण्याचा निर्णय कुणाचा होता?

  • कंपनी स्थापनेचा निर्णय घेण्यात आला त्यावेळच्या बैठकीत तुम्ही सहभागी होता?

  • यंग इंडियन कंपनीच्या किती बैठकांमध्ये तुम्ही हजेरी लावली?

  • तुमची संपत्ती कुठे कुठे आहे?

  • परदेशातही तुमची मालमत्ता आहे?

  • यंग इंडियन कंपनीशी तुम्ही कसे जोडले गेलात?

  • तुम्ही यंग इंडियन कंपनीचे डायरेक्टर कसे बनलात?

  • तुम्ही कोणत्या प्रकारे शेअर खरेदी केलात?

  • शेअर खरेदीसाठी तुम्हाला कुणी पैसे दिले होते?

  • शेअर खरेदीसाठी कोणत्या बँकेच्या खात्यातून पैसे दिले?


नॅशनल हेराल्ड म्हणजे काय?


नॅशनल हेराल्ड हे वृत्तपत्र आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1938 साली हे वृत्तपत्र सुरू केले होते. हे वृत्तपत्र चालवण्याची जबाबदारी 'असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड' (एजेएल) नावाच्या कंपनीकडे होती. या कंपनीवर सुरुवातीपासून काँग्रेस आणि गांधी घराण्याचे वर्चस्व होते. तब्बल 70 वर्षांनंतर 2008 मध्ये हे वृत्तपत्र तोट्यात गेल्यामुळे बंद करावे लागले. त्यानंतर काँग्रेसने पक्ष निधीतून एजेएलला 90 कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज दिले. मग सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी 2010 मध्ये 'यंग इंडियन' नावाची नवी कंपनी स्थापन केली. असोसिएटेड जर्नल्सला दिलेल्या कर्जाच्या बदल्यात यंग इंडियनला कंपनीत 99 टक्के हिस्सा मिळाला. सोनिया आणि राहुल गांधी यांची यंग इंडियन कंपनीत 38-38 टक्के हिस्सेदारी आहे. बाकीचा हिस्सा मोतीलाल बोरा आणि ऑस्कर फर्नांडिस यांच्याकडे होता.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


National Herald Case : काय आहे नॅशनल हेराल्ड केस? याप्रकरणी सुरू आहे राहुल गांधींची चौकशी