National Herald Case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी आज काँग्रेस (Congress) अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची दुसऱ्यांदा ईडी (ED) चौकशी केली जाणार आहे. काँग्रेसकडून देशभर निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. तर मुंबईतही मंत्रालयाजवळच्या गांधी पुतळ्यासमोर काँग्रेसकडून सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार आहे. दरम्यान, आज सोनिया गांधींची (Congress President Sonia Gandhi) दुसऱ्यांदा ईडी चौकशी केली जाणार आहे. यापूर्वी ईडीनं गुरुवारी (21 जुलै) सोनिया गांधी यांची चौकशी केली होती. त्यानंतर त्यांना सोमवारी म्हणजेच, 25 जुलै रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी समन्स बजावलं होतं. पण पुन्हा नव्यानं समन्स बजावत  25 ऐवजी 26 जुलैला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. 


नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राशी संबंधित कथित मनी लाँड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने गुरुवारी (21 जुलै) सोनिया गांधी यांची चौकशी केली होती. ही चौकशी सुमारे दोन ते तीन तास चालली. त्यानंतर तपास यंत्रणेनं त्यांना सोमवारी म्हणजेच, 25 जुलै रोजी हजर राहण्यास सांगितलं होतं. परंतु सोनिया गांधी यांना आता सोमवारी (25 जुलै) नव्हे तर मंगळवारी (26 जुलै) तपास यंत्रणेसमोर हजर राहणं आवश्यक असल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. तारीख बदलण्याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.


सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीनं चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितलं होतं. पण त्यावेळी कोरोनाची लागण झाल्यानं त्या चौकशीसाठी उपस्थित राहिल्या नव्हत्या. कोरोनामुक्त झाल्यानंतर सोनिया गांधी ईडी चौकशीला उपस्थित राहिल्या. त्यामुळे कोविड प्रोटोकॉल लक्षात घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली होती, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. यावेळी सोनिया गांधी यांच्यासोबत पुत्र राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि कन्या प्रियांका गांधी वाड्राही (Priyanka Gandhi Wadra) उपस्थित होत्या. सोनिया गांधी यांचं वय आणि प्रकृती लक्षात घेऊन ईडीनं प्रियांका गांधी यांना विशेष सूट म्हणून ईडी कार्यालयातील चौकशी कक्षापासून दूर आईसोबत जाण्याची परवानगी दिली होती.


नॅशनल हेराल्ड म्हणजे काय?


नॅशनल हेराल्ड हे वृत्तपत्र आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1938 साली हे वृत्तपत्र सुरू केले होते. हे वृत्तपत्र चालवण्याची जबाबदारी 'असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड' (एजेएल) नावाच्या कंपनीकडे होती. या कंपनीवर सुरुवातीपासून काँग्रेस आणि गांधी घराण्याचे वर्चस्व होते. तब्बल 70 वर्षांनंतर 2008 मध्ये हे वृत्तपत्र तोट्यात गेल्यामुळे बंद करावे लागले. त्यानंतर काँग्रेसने पक्ष निधीतून एजेएलला 90 कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज दिले. मग सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी 2010 मध्ये 'यंग इंडियन' नावाची नवी कंपनी स्थापन केली. असोसिएटेड जर्नल्सला दिलेल्या कर्जाच्या बदल्यात यंग इंडियनला कंपनीत 99 टक्के हिस्सा मिळाला. सोनिया आणि राहुल गांधी यांची यंग इंडियन कंपनीत 38-38 टक्के हिस्सेदारी आहे. बाकीचा हिस्सा मोतीलाल बोरा आणि ऑस्कर फर्नांडिस यांच्याकडे होता.


दरम्यान याप्रकरणी ईडीनं यापूर्वी सोनिया गांधी यांचे पुत्र आणि खासदार राहुल गांधी यांचीही चौकशी केली होती. त्याचवेळी काँग्रेसनं ईडीच्या कारवाईचा निषेध करत राजकीय सूडबुद्धीनं ही कारवाई करत असल्याचं म्हटलं होतं. चौकशीच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी देशव्यापी निदर्शनं केल्यानंतर अनेक काँग्रेस नेत्यांना ताब्यातही घेण्यात आलं होतं.