India-China Dispute On LAC: गेल्या पाच वर्षांत भारताने चीन सीमेजवळ सुमारे 2088 किमी लांबीच्या रस्त्याचे बांधकाम पूर्ण केले आहे. या संदर्भात संरक्षण मंत्रालयाने सोमवारी एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात संसदेत ही माहिती दिली. राज्यसभेत खासदार सरोज पांडे यांच्या प्रश्नावर लेखी माहिती देताना संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट म्हणाले की, गेल्या पाच वर्षांत बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO) ने चीन सीमेवर एकूण 2088.57 किलोमीटर लांबीचे रस्ते बांधले आहेत. 


या रस्त्यांच्या निर्मितीसाठी 15477.06 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. संरक्षण राज्यमंत्र्यांनी सांगितले की, चीनच्या सीमेला लागून असलेल्या नियंत्रण रेषेवर बनवलेले हे सर्व रस्ते सर्वमान्य आहेत. म्हणजेच त्यावर वर्षाच्या 12 ही महिन्यात हालचाल केली जाऊ शकते. गेल्या आठवड्यातच चीनने घोषणा केली होती की, तिबेट ते शिनजियांग हा नवीन एक्सप्रेस हायवे (G-695) बांधणार आहे. जो भारतातील अक्साई-चीनमधून जाईल.


1962 पासून अक्साई चीनवर बेकायदेशीर कब्जा


1962 च्या युद्धापासून चीनने अक्साई-चीनवर बेकायदेशीरपणे कब्जा केला आहे. चीन तिबेट ते शिनजियांग दरम्यान चीन व्हाया अक्साई हा दुसरा महामार्ग बांधणार आहे. यापूर्वी 1957 मध्ये चीनने असा महामार्ग (G-219) बांधला होता. जो अक्साई-चीनमधून गेला असून जो 1962 मध्ये भारत आणि चीनमधील युद्धाचे प्रमुख कारण बनला होता. सोमवारी भारत-चीन सीमेवरील रस्त्यांची माहिती देण्याव्यतिरिक्त, संरक्षण राज्यमंत्र्यांनी संसदेत असेही सांगितले की, गेल्या पाच वर्षांत बीआरओने पाकिस्तानवर 1336.09 किमी (एकूण खर्च 4242 कोटी) कव्हर केले आहे. म्यानमार सीमेवर 151.15 किमी (एकूण खर्च 882.52 कोटी) आणि बांगलादेश सीमेवर 19.25 किमी (एकूण खर्च 165.45 कोटी) बांधण्यात आले आहेत.


एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना संरक्षण राज्यमंत्र्यांनी असेही सांगितले की, संरक्षण क्षेत्रात मेक इन इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने 358 खाजगी कंपन्यांची नियुक्ती केली आहे. तसेच 584 संरक्षण परवाने जारी केले आहेत. यामध्ये 107 शस्त्रास्त्र निर्मितीचे परवाने देण्यात आले आहेत.