National Girl Child Day : भारतात दरवर्षी 24 जानेवारी रोजी ‘राष्ट्रीय बालिका दिन’ (National Girl Child Day 2024) साजरा केला जातो. यावर्षी भारतात 16 वा राष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जात आहे. मुलींना त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी आणि त्यांना विकासाच्या समान संधींसह समाजात सन्मान मिळावा या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. भारतात लैंगिक भेदभाव ही काही नवीन गोष्ट नाही, शतकानुशतके ही प्रथा चालत आली आहे. मुलींना (Girl) मुलांप्रमाणेच सर्व हक्क मिळावे, हा उद्देश बालिका दिन साजरा करण्यामागे आहे. राष्ट्रीय बालिका दिवस हा बालिकांना शिक्षा, स्वास्थ्य आणि रोजगार या गोष्टींबाबत जागरूक करतो. 


आता राष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्याची सुरुवात नेमकी कधी झाली आणि हा दिन साजरा करण्यासाठी आजचाच दिवस का निवडण्यात आला? जाणून घेऊया.


राष्ट्रीय बालिका दिनाचा इतिहास 


भारतामध्ये राष्ट्रीय बालिका दिन पहिल्यांदा 24 जानेवारी 2008 रोजी साजरा करण्यात आला होता.  2008 मध्ये भारत सरकारच्या महिला आणि बाल विकास मंत्रालयाने राष्ट्रीय बालिका दिनाची सुरूवात केली. महिला सक्षमीकरण आणि लैंगिक समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी 24 जानेवारी हा राष्ट्रीय बालिका दिन म्हणून निवडला गेला.


 24 जानेवारीलाच का साजरा केला जातो बालिका दिन?


24 जानेवारीला बालिका दिन साजरा करण्याचं एक खास कारण म्हणजे,  इंदिरा गांधी यांनी 24 जानेवारी 1966 रोजी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. त्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. देशाच्या कन्येने या पदापर्यंत पोहोचलेल्या कामगिरीची आठवण म्हणून दरवर्षी या दिवशी राष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जातो. इंदिरा गांधींना पंतप्रधान पद मिळणं हा एक क्रांतिकारी बदल होता आणि महिला सशक्तीकरणाच्या दिशेने एक पाऊल होतं.


राष्ट्रीय बालिका दिन का साजरा केला जातो?


राष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्याचा उद्देश भारतातील मुलींना आधार आणि संधी प्रदान करणं हा आहे. मुलींना त्यांच्या हक्कांबद्दल आणि शिक्षणाबद्दल जागृक करणं, तसेच  आरोग्य आणि पोषण याबद्दल जागरूकता वाढवणं, हा राष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्यामागील उद्देश आहे. स्त्री भ्रूणहत्या आणि लैंगिक असमानता ते लैंगिक शोषण या सर्व मुद्द्यांवर मुली आणि जनतेला जागरूक करण्यासाठी राष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जातो. 


हेही वाचा:


Hair Care : लांब, सुंदर आणि चमकदार केस हवे आहेत? पाण्यात फक्त 'या' गोष्टी मिसळून वापरा; सर्व समस्यांपासून सुटका