PM Modi to President Droupadi Murmu: नवी दिल्ली : अयोध्येतील (Ayodhya) राम मंदिराचा (Ram Mandir) भव्यदिव्य उद्घाटन सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. या सोहळ्याला देश-विदेशातील दिग्गजांनी हजेरी लावली होती. अशातच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) पत्र लिहून त्यांचं अभिनंदन केलं होतं. राष्ट्रपतींच्या पत्राला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पत्रातून उत्तर दिलं आहे. राम मंदिरात प्रभू श्रीरामाचा अभिषेक होणं, हा त्याच्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षणांपैकी एक होता आणि तिथून परतताना एक वेगळी अयोध्या मनात साठवून मी परतलो, जिच्यापासून मी कधीच दूर जाऊ शकत नाही, असं मोदींनी पत्रात लिहिलं आहे. 


ट्विटरवर राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्राची प्रत शेअर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, दोन दिवसांपूर्वी मला आदरणीय राष्ट्रपतींचं एक प्रेरणादायी पत्र मिळालें. आज मी पत्राद्वारे कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे." दरम्यान, राष्ट्रपती मुर्मू यांनी रविवारी अभिषेक करण्यापूर्वी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं होतं. त्या पत्रात त्यांनी म्हटलं होतं की, "अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याबाबत देशभरात उत्सवाचं वातावरण हे भारताच्या चिरंतन आत्म्याचं अखंड अभिव्यक्ती आहे आणि एक नवं चक्र आहे. ही देशाच्या पुनरुज्जीवनाची सुरुवात आहे."


देशाच्या पुनरुज्जीवनाच्या नव्या चक्राची सुरुवात : राष्ट्रपती


राष्ट्रपती मुर्मू यांनी रविवारी अभिषेक करण्यापूर्वी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून म्हटलं होतं की, अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याबाबत देशभरात उत्सवाचं वातावरण हे भारताच्या चिरंतन आत्म्याचं अखंड अभिव्यक्ती आहे आणि एक नवं चक्र आहे. देशाच्या पुनरुज्जीवनाची सुरुवात आहे.


मीही मनात अयोध्या घेऊन परतलो : पंतप्रधान 


राष्ट्रपतींच्या पत्राला उत्तर देताना मोदी म्हणाले आहेत की, "माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षणांचा साक्षीदार होऊन अयोध्या धामहून परतल्यानंतर मी तुम्हाला हे पत्र लिहित आहे. मी पण मनात अयोध्या घेऊन परतलो आहे. अशी अयोध्या जी माझ्यापासून कधीही दूर जाऊ शकत नाही.'' पंतप्रधानांनी राष्ट्रपतींच्या शुभेच्छा आणि आपुलकीबद्दल आभार मानले आणि पत्राच्या प्रत्येक शब्दांत त्यांनी आपला दयाळू स्वभाव आणि अभिषेक आयोजित केल्याबद्दल अपार आनंद व्यक्त केला. मोदी म्हणाले की, जेव्हा त्यांना हे पत्र मिळालं तेव्हा ते एका वेगळ्याच 'भाव यात्रे'वर होते आणि त्यांच्या पत्रामुळे त्यांना त्यांच्या भावना हाताळण्यात मोठा आधार आणि बळ मिळालं. 


यात्रेकरू म्हणून अयोध्या धामला भेट दिली : पंतप्रधान 


पंतप्रधान म्हणाले की, "मी यात्रेकरू म्हणून अयोध्या धामला गेलो होतो. श्रद्धा आणि इतिहासाचा असा संगम घडलेल्या या पवित्र भूमीला भेट दिल्यानंतर माझं मन अनेक भावनांनी भारावून गेलं. पंतप्रधान म्हणाले की, अशा ऐतिहासिक प्रसंगाचे साक्षीदार होणं हा माझ्यासाठी बहुमान आणि जबाबदारी आहे. राष्ट्रपती मुर्मू यांनी लिहिलेल्या पत्रात पंतप्रधानांनी 11 दिवसांच्या व्रत विधी आणि त्याच्याशी संबंधित यम-नियमांचा उल्लेख केला होता. त्यावर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, "आपला देश अशा असंख्य लोकांचा साक्षीदार आहे, ज्यांनी शतकानुशतकं विविध संकल्पांचं पालन केलं जेणेकरून श्रीराम पुन्हा एकदा त्यांचं वैभव प्राप्त करू शकले." ते पुढे म्हणाले की, "या शतकानुशतकांच्या उपवासाच्या पूर्ततेचा संवाहक बनणं हा माझ्यासाठी खूप भावनिक क्षण होता आणि मी ते माझं भाग्य समजतो."