नवी दिल्ली : देशात गेल्या पाच दिवसात दुसऱ्यांदा एकाच दिवशी कोरोना लसीचे एक कोटी डोस देण्याचा विक्रम करण्यात आला आहे. मंगळवारी एकाच दिवसात तब्बल 1.30 कोटी लोकांना कोरोना लसीचा डोस देण्यात आला आहे. याचसोबत भारतात आता कोरोना लसीचे 65 कोटीहून जास्त डोस देण्यात आले असून देशातील 50 टक्के लोकांना पहिला डोस मिळाला आहे. हिमाचल प्रदेशने राज्यातील 100 टक्के लोकांना कोरोना लसीचा पहिला डोस दिला असून असं करणारे ते देशातील पहिलेच राज्य आहे. 


ऑगस्ट महिन्यात एकूण 18.6 कोटी डोस देण्यात आले आहेत. एकाच महिन्यात कोरोनाच्या इतक्या मोठ्या प्रमाणात डोस देणारा भारत हा एकमेव देश आहे. तर 21 ते 27 ऑगस्ट या दरम्यान, एकाच आठवड्यात देशात एकूण 4.66 कोटी लसी देण्यात आल्या, हाही एक विक्रमच आहे. 


 






कोरोना लसीकरणाचा मंगळवारी 228 वा दिवस होता. काल संध्याकाळी सात वाजेपर्यंत देशात कोरोना लसीचे 1.04 कोटी डोस देण्यात आले होते. त्यावेळीच देशातील 50 नागरिकांना लसीचा पहिला डोस पूर्ण झाल्याची नोंद झाली. 


कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत असताना देशातील लसीकरणाच्या कार्यक्रमाने वेग घेतला आहे. येत्या काळातही लसीकरणाचा वेग हा असाच ठेवण्यात येणार असून देशातील जास्तीत जास्त लोकसंख्येचे लवकरात लवकर लसीकरण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. 


देशातील लसीकरणाच्या या विक्रमाचे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मडाविया यांनी कौतुक केलं असून आपल्या संदेशात ते म्हणाले की, "देशातील लसीकरणाच्या या विक्रमाचे श्रेय हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या #SabkoVaccineMuftVaccine  अभियानाला जाते. मोदींचे प्रयत्न आणि सातत्याने श्रम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचं आहे. देशात दिवसेंदिवस लसीकरणाची संख्या वाढत आहे. यासाठी  सर्व भारतीय नागरिकांचे अभिनंदन." 


संबंधित बातम्या :