दोहा : अफगाणिस्तानमधील बदललेल्या परिस्थितीमध्ये, प्रथमच अधिकृतपणे भारत आणि तालिबान यांच्यात मंगळवारी दोहामध्ये बैठक पार पडली. या दरम्यान, अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षेसह अनेक मुद्द्यांवर दोघांमध्ये चर्चा झाली. भारत सरकारने ही  माहिती दिली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की,, कतारमधील भारतीय राजदूत दीपक मित्तल यांनी तालिबान नेते एस. एम.अब्बास स्तानिकझाई यांची भेट घेतली. या बैठकीत सुरक्षा, अफगाणिस्तानातून भारतीयांच्या लवकर मायदेशी येण्यावर चर्चा झाली.


परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की तालिबानने केलेल्या विनंतीनंतर दोहा येथील भारतीय दूतावासात ही बैठक झाली. अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांबद्दल आजच्या बैठकीत चर्चा झाली आहे. यासोबतच भारतीयांच्या सुरक्षेबाबतही चर्चा झाली आहे.






परराष्ट्र मंत्रालयाने पुढे सांगितले की, अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेवर आणि त्वरित मायदेशी येण्यावर ही चर्चा केंद्रित होती. अफगाण नागरिक, विशेषत: अल्पसंख्यांक, ज्यांना भारतात यायचे आहे, त्यांच्यावरही या बैठकीत चर्चा झाली. भारताचे राजदूत दीपक मित्तल यांनी अफगाणिस्तानचा वापर भारताविरुद्धच्या कारवाईसाठी करु नये हा मुद्दाही उपस्थित केला गेला.


दहशतवादाला कोणत्याही प्रकारे समर्थन देणाऱ्या उपक्रमाला अफगाणिस्तानच्या भूमीतून पाठिंबा मिळू नये. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की तालिबानच्या नेत्याने भारतीय राजदूत दीपक मित्तल यांना आश्वासन दिले आहे की सर्व मुद्दे सकारात्मक पद्धतीने हाताळले जातील.


अफगाणिस्तानातून सर्व अमेरिकन सैनिक परतले
 
अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्याने 31 ऑगस्टच्या अंतिम मुदतीपूर्वी काबूल सोडले आहे. अफगाणिस्तान पूर्णपणे तालिबानच्या ताब्यात गेला आहे. अशा परिस्थितीत, भारतीयांच्या सुरक्षित मायदेशी परतण्यासह अनेक प्रश्न आहेत, ज्याबद्दल सरकार खूप गंभीर आहे.


इतर बातम्या