नवी दिल्ली : इस्रोच्या महत्वाकांक्षी 'चांद्रयान 2'च्या विक्रम लँडरचा अमेरिकेच्या नासाने शोध लावला आहे. चांद्रयानाच्या विक्रम लँडरचे तुकडे सापडल्याची माहिती नासाने ट्विटरवरून दिली आहे. नासा मून या त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून विक्रम लँडरच्या तुकड्यांचे फोटो ट्विट करण्यात आले आहे. विक्रम लँडरचा शोध लावण्यात भारतीय अभियंता शान उर्फ षण्मुगा सुब्रमण्यम यांनी नासाची मदत केली आहे. त्यासंदर्भात नासाने त्यांचे आभार मानले आहे. 7 सप्टेंबरला इस्रोचा विक्रम लँडरशी संपर्क तुटला होता.

मदुराईचे शान यांनी विक्रम मून लँडर चंद्रावर नक्की कुठे आदळलं ती जागा शोधुन काढली. त्यासंदर्भातील माहिती त्यांनी नासाला दिली होती. त्यावर नासाने शोध मोहीम राबवली. नासाच्या लूनार रेकनेन्सेस ऑर्बिटरने विक्रम लँडरचे हे फोटो टिपले आहेत. विक्रम लँडरच्या चंद्रावर ज्या ठिकाणी लँडींग होणार होते, तिथपासून 750 मीटर अंतरावर नासाला हे तुकडे सापडले आहेत. या फोटोत विक्रमचे तीन तुकडे दिसत आहेत. विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर आदळल्यानं त्याचा पृष्ठभागावरील परिणाम या फोटोंमध्ये दिसून येत आहे. या परिणाम झालेल्या भागाला इम्पॅक्ट साइट (Impact Site)असं नाव देण्यात आलं आहे. इस्रोने याबाबतची सविस्तर माहिती नासाकडे मागितली आहे.


शानच्या या कामगिरीबद्दल नासाने मेल पाठवून त्यांचं कौतुक केलं आहे. शान हे मेकॅनिकल इंजिनिअर आहेत.


चंद्रावर उतरत असताना इस्रोचा विक्रम लँडरशी संपर्क तुटला -
7 सप्टेंबर 2019 ला 'चांद्रायन 2'मधील 'विक्रम' लॅंडरला चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या प्रदेशात 'मॅंझिनस सी' आणि 'सिंपेलिअस एन' या दोन विवरांच्यामध्ये उतरविण्यात येणार होते. चांद्रभूमीपासून 30 किलोमीटर अंतरावर असताना पहाटे 1 वाजून 38 मिनिटांनी विक्रम लँडर उतरविण्याची प्रक्रिया सुरु झाली. 'विक्रम'चा वेग कमी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. एक वाजून 48 मिनिटांनी विक्रम चंद्रापासून केवळ 7.4 किलोमीटर अंतरावर होता. त्यानंतर त्याच्या दिशादर्शक यंत्रणांच्या साह्याने जागेची निश्‍चितीही करण्यात आली होती. मात्र चांद्रभूमीपासून केवळ 2.1 किलोमीटर अंतरावर असताना विक्रम लॅंडरचा पृथ्वीवरील केंद्राशी असलेला संपर्क तुटला. यानंतर सातत्याने 10 दिवस संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरु होता. 8 सप्टेंबरला चांद्रयान 2 वरच्या ऑनबोर्ड कॅमेऱ्यातून लँडर चंद्रभूमीवर असल्याचं दिसलं, असं इस्रोनं सांगितलं होतं.

संबंधित बातम्या :

'या' ठिकाणी चांद्रयान 2 उतरलं, नासाकडून फोटो जारी

"इस्रोची कामगिरी आमच्यासाठी प्रेरणादायी" 'नासा'कडून चांद्रयान 2 मोहिमेचं कौतुक

Breakfast News | लॅण्डरशी संपर्क तुटण्यामागील कारण काय? इस्रोचे माजी समूह संचालक सुरेश नाईक यांच्याशी बातचीत | ABP Majha