BLOG : भारतीय समाजाने कायम स्त्रीला गप्प बसायला भाग पाडलं. तिने लहानपणी खेळायचं काय तर भातुकली. म्हणजे त्यात पुन्हा लग्न, स्वयंपाक, घरची कामं याचं प्रतिबिंब बाहुलीच्या रूपाने पडलेलं असे. तिच्या मनावर ही तिची आयुष्यातली भूमिका बिंबवण्याचा तो मार्ग होता. हुतूतू, लंगडी, खोखो, सागरगोटे हे तिचे लहानपणचे ठरलेले खेळ. पुढे नवऱ्याला कायमचं जीवदान मिळावं (ही मेली तरी चालेल) म्हणून जसं वटपौर्णिमेचा उपास, हरतालिकेचा उपास तशी मंगळागौर पुजायची आणि त्या रात्री झिम्मा, फुगडी, लोळण फुगड़ी (जी तिला आयुष्यभरासाठी आवश्यक असते), इत्यादी खेळ खेळायला मिळत. दुसऱ्या दिवशी पुन्हा संसाराचे व्याप-ताप चालू. मग ती शिकली व नोकरीला लागली. तर, इंदिरा संतांच्या शब्दात, 'शिजवणारी तीच आणि शिजणारी तीच तिच्याभोवती एक रिंगण आहे. लक्ष्मणरेषेसारखं ते तिने ओलांडायचं नाही.


परंतु या स्वतंत्र भारतातल्या मुली हे सगळं ओलांडून क्रिकेट, टेबल टेनिस, हॉकी आणि आपली भारतीय कुस्तीही खेळू लागल्या. तेव्हा नवल वाटलं. मुक्ताईच्या शब्दात तर और नवलाव झाला आणि हे काहीच करू न शकलेल्या देशातल्या लक्षावधी स्त्रियाची मान हे खेळ खेळणाऱ्या मुलींनी उंचावली. स्त्रियांना दिलासा मिळाला. पण आता अघटीत घडत आहे. रोज वृतपत्रात काय वाचायला मिळतंय, तर विनेश फोगट, साक्षी मलिक आणि त्यांच्या सहकारी मुली राजधानी दिल्लीमधे उपोषणाला, आंदोलनाला बसल्यात. या अशा भयंकर उन्हाच्या झळा अंगावर घेत आहेत. त्यांचं अगदी साधं म्हणणं आहे. 'भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रृजभूषण शरण सिंह यांना अटक करा कारण त्यांनी या मुलीचं लैंगिक शोषण केले आहे. असे प्रत्यक्ष कुठली स्त्री बोलेल? परंतु जागतिक स्तरावर आपल्या खेळाने देशाची मान उन्नत करणाऱ्या मुली जेव्हा अती झालं तेव्हा आंदोलन करायला पुढे आल्या. आपल्या देशात हजारो वर्ष स्त्रीला जिवंतपणे जाळलं गेलं. तिला केशवपन करून विद्रूप केलं गेलं. विधवा म्हणून तिचं शोषण केलं गेलं. 'घटश्राद्ध' चित्रपट आठवत असेलच, तरीही ती आईवडील, भाऊ, नवरा, मुल यांच्यासाठी ती गप्प बसली.


काळ बदलत गेला. आज सर्व क्षेत्रात स्त्रिया मुली वावरताहेत. आपल्या बुद्धीने पुरुषांचे डोळे दीपवीत आहेत. तरीही ब्रृजभूषणसारखे साप-विंचू डंख मारायला आहेतच. आणि ज्या पोलीस खात्याने सरकारने यासाठी पिडीतांना संरक्षण द्यायच ते सर्व डोळे झाकून कान बंद करून बसलेत. कौरव सभेतल्या कौरवपांडवांसारखे? न्यायालयानी याची दखल घ्यायला नको का? तिथेही स्त्रिया न्यायाधीश आहेतच ना, स्त्री पोलीस अधिकारी आहेत ना?


स्त्री, म्हणजे या पुरुषांना आपली मालमता वाटते का? स्वतः विवाहित असतात, त्यांना मुली असतात, घरात आई, बहीण असते अशांना अशी दुष्कृत्ये करताना जराही शरम लाज वाटत नाही? उगीच त्या कुस्तीपटू उन्हात बसल्यात का? 


विनेश फोगट, साक्षी मलिक आणि तुमच्या साथीदारांना, मी एक लेखक, कवयित्री, महाराष्ट्रातली मराठी मातृभाषी कन्या सांगू इच्छिते की, माझ्यासारख्या अनेक स्त्रिया तुमच्या पाठीशी आहेत हे लक्षात ठेवा. सगळ्या जगभर तुमच्या आंदोलनाची बातमी पोचली असेलच. या रोजच्या बातम्यांनी मनाला वेदना होतात. शासनकर्त्यामधे स्त्रिया आहेतच. त्यांना कधीतरी आपल्या स्त्रीत्वाची जाणीव होईल आणि त्या तुमच्यापर्यंत धावून येतील, यात मला शंका वाटत नाही. महाराष्ट्र कन्या मेधा पाटकर आपल्याला भेटून बळ देऊन गेल्या. आम्हाला तिथपर्यंत पोचता येत नाही. तरीही रोज तुमच्यासाठी 'घास रोज अडतो ओठी हे लक्षात घ्या. तुमचं आंदोलन यशस्वी होवो ही सदिच्छा!


(या लेखात व्यक्त झालेली मते लेखकाची स्वतःची आहेत. त्याच्याशी एबीपी माझा, abpmajha.com किंवा एबीपी नेटवर्क सहमत असतील असं नाही)