Karnataka CM swearing-in ceremony: कर्नाटकमध्ये भाजपला धुळ चारून एकहाती सत्ता आणल्यानंतर काँग्रेस नेतृत्वाला मुख्यमंत्रीपदाचा पेच पाचव्या दिवशी सोडवण्यात यश आले. आज काँग्रेसकडून कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी सिद्धरामय्या यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. कर्नाटकातील काँग्रेसचे बाहुबली नेते डीके शिवकुमार जोरदार मोर्चेबांधणी करूनही त्यांना उपमुख्यमंत्रीपदी समाधान मानावे लागले आहे. मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटल्यानंतर काँग्रेसकडून तातडीने शपथविधी सोहळ्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. शपथविधी सोहळा 20 मे रोजी होणार आहे. 


कर्नाटक मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक काँग्रेसकडून विरोधकांची वज्रमूठ दिसेल यासाठी देशभरातील नेत्यांना निमंत्रित केले आहे. कर्नाटक प्रदेश काँग्रेसकडून काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका वाड्रा यांना निमंत्रित केलं आहे. त्याचबरोबर देशभरातील काँग्रेस मुख्यमंत्र्यांसह प्रादेशिक पक्षातील नेत्यांनाही निमंत्रित केलं आहे. 


देशभरातील या नेत्यांना निमंत्रण 


छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुखू, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, सपा प्रमुख अखिलेश यादव, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, नॅशनल काॅन्फरन्सचे फारुख अब्दुल्ला आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे.


महाराष्ट्रातून कोणाला निमंत्रण?


दरम्यान, कर्नाटक काँग्रेसकडून महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना निमंत्रित करण्यात आले आहे. शरद पवार शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. उद्धव ठाकरे यांना निमंत्रित करण्यात आलं असलं तरी ते जाणार की नाही? याबाबत दुजोरा मिळू शकलेला नाही. 


शिवकुमारांची नाराजी दूर करण्यासाठी सोनिया गांधी सरसावल्या 


दरम्यान, डीके शिवकुमार यांनी जोरदार मोर्चेबांधणी करूनही त्यांना मुख्यमंत्रीपद मिळू शकले नाही. मात्र, अडीच वर्षांचा फाॅर्म्युला ठरल्याचे समजते. शिवकुमार यांची नाराजी दूर करण्यासाठी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना पुढाकार घ्यावा लागला. त्यांनी नाराजी दूर केल्यानंतर शिवकुमार तडजोडीसाठी तयार झाले. शिवकुमार काँग्रेसचे "ट्रबल शूटर" म्हणून ओळखले जातात. परंतु, जेव्हा ते मुख्यमंत्रीपदासाठी शिवकुमार सिद्धरामय्यांचा अडथळा दूर करू शकले नाहीत.


डीके शिवकुमार कर्नाटक काँग्रेस प्रदेशाध्यक्षही आहेत. त्यांच्याच नेतृत्वात पक्षाने 10 मे रोजी झालेल्या निवडणुकीत 224 सदस्यीय विधानसभेत 135 जागांसह दणदणीत विजय मिळवला. 61 वर्षीय डीके शिवकुमार आठव्यांदा आमदार झाले असून त्यांच्या संघटन कौशल्यामुळे पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांची जोरदार प्रशंसा केली आहे. सर्वोच्च पद मिळविण्यासाठी त्यांनी लढा दिला. परंतु, त्यांना उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानावे लागले.


इतर महत्वाच्या बातम्या