Rahul Gandhi Wrote Letter To Parliament Speaker: लोकसभेत (Lok Sabha Session) राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी हिंदूंबाबत केलेल्या वक्तव्यावरुन प्रचंड गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर राहुल गांधींच्या भाषणातून मोठा भाग वगळण्यात आला. भाषणातून मोठा भाग काढून टाकण्यात आल्यानं विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी यासंदर्भात लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून यासंदर्भात निषेध व्यक्त केला आहे. आपल्या भाषणाचा मोठा भाग संसदेच्या कामकाजातून काढून टाकण्यात आल्यानं आपल्याला धक्का बसल्याचं राहुल गांधी यांनी आपल्या पत्रात नमूद केलं आहे. 


राहुल गांधी यांनी आपल्या पत्रात लिहिलं आहे की, राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेदरम्यान माझ्या भाषणातील काही भाग वगळण्यात आल्यामुळे मी हे पत्र लिहित आहे. सभागृहाच्या कामकाजातून भाषणाचा काही भाग वगळण्याचा अधिकार अध्यक्षांना असला तरीदेखील लोकसभेतील कार्यपद्धती आणि कामकाजाच्या नियमांच्या नियम 380 मध्ये ज्यांचं स्वरूप नमूद केलं आहे, तेच शब्द वगळण्याची तरतूद आहे.'


भाषणाचा भाग काढून टाकल्यानं धक्का बसलाय : राहुल गांधी 


राहुल गांधींनी पत्रात पुढे लिहिलं आहे की, "माझ्या भाषणाचा मोठा भाग कार्यवाहीतून कसा काढून टाकण्यात आला आणि उतारे हटवण्याच्या नावाखाली कसं हटवलं गेलं हे पाहून मला धक्का बसला आहे. मी 2 जुलै रोजी लोकसभेत झालेल्या चर्चेतील काही उतारे जोडत आहे, ज्यात बदल केलेला नाही. हटवलेले भाग नियम 380 च्या कक्षेत येत नाहीत, असं मी म्हणण्यास बांधील आहे. मला सभागृहात जो संदेश द्यायचा होता, तो म्हणजे ग्राउंड रिॲलिटी, वस्तुस्थिती आहे."


लोकांच्या समस्या मांडण्याचा अधिकार : राहुल गांधी 


पत्रात राहुल गांधी यांनी नमूद केलं आहे की, "सदनातील प्रत्येक सदस्य जो लोकांच्या सामूहिक आवाजाचं प्रतिनिधित्व करतो, त्याला भारतीय राज्यघटनेच्या कलम 105 (1) नुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. लोकांच्या समस्या सभागृहात मांडणं हा प्रत्येक सदस्याचा अधिकार आहे. हा समान अधिकार आहे. देशातील लोकांप्रती असलेली माझी जबाबदारी पार पाडत आहे, ज्याचा मी काल वापर करत होतो." 


भाषणातून हटवलेला मजकूर पुन्हा पटलावर घ्या : राहुल गांधी 


भाजप खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचं भाषणही आरोपांनी भरलेलं होतं. मात्र, त्यांच्या भाषणातून एकच शब्द काढण्यात आला, असं काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगितलं. याबाबत केलेला भेदभाव समजण्यापलीकडचा आहे, असंही ते पत्रात म्हणाले आहेत. 


राहुल गांधी म्हणाले की, मला अनुराग ठाकूर यांच्या भाषणाकडे लक्ष वेधायचं आहे. ज्यांचं भाषण आरोपांनी भरलेलं होतं. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे, एकच शब्द काढण्यात आला आहे. तुमच्याबद्दल योग्य तो आदर ठेवून, मी विनंती करतो की, पटलावरुन वगळण्यात आलेल्या मजकुराचा पुन्हा समावेश करावा.