लखनौ : उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यानाथ (Yogi Adityanath) सरकारने 19 जुलै रोजी कावड यात्रेच्या मार्गात येणाऱ्या सर्व भोजनालयांवर मालकाचे नाव लावण्याचा आदेश जारी केला आहे. याआधी उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगर पोलिसांनी असाच एक निर्णय घेतला होता. पण विरोधी पक्षांकडून सडकून टीका झाल्यानंतर मुझफ्फरनगरच्या पोलिसांनी भोजनालयांवर मालकाचे नाव लावणे ऐच्छिक असल्याचे म्हटले होते. या निर्णयाच्या एका दिवसानंतर उत्तर प्रदेश सरकारनेच कावड यात्रेच्या मार्गावर असणाऱ्या भोजनालयांवर मालकांचे नाव लावण्यात यावे, असा आदेश जारी केला आहे.
पावित्र्य जपण्यासाठी निर्णय
उत्तर प्रदेशमध्ये जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार खाद्यपदार्थाचे प्रत्येक दुकान तसेच हातगाड्यांवर मालगाचे नाव सांगणारा बोर्ड लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. कावड यात्रेत सहभागी झालेल्यांचे पावित्र्य जपण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले. या शासन निर्णयानंतर उत्तर प्रदेशमध्ये प्रत्येक रेस्टॉरंट, भोजनालय, रस्त्याच्या बाजूचे ढाबे, फूड स्टॉल अशा प्रत्येकांनाच मालकाच्या नावाचा बोर्ड लावला जाणार आहे.
बिहारमध्येही केली जातेय मागणी
उत्तर प्रदेश सरकारच्या या निर्णयानंतर आता उत्तर भारतातील राजकारण चांगलेच तापले आहे. बिहारमध्येही कावड मार्गावरील भोजनालयांवर मालकाचे नाव लावण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे. भाजपाचे आमदार हरिभूषण ठाकूर यांनी तशी मागणी केली आहे. या निर्णयामुळे यात्रेकरू भोजनालयात नाव पाहू शकतील. त्यामुळे यात्रेकरूंना वाटले तर ते संबंधित दुकानात जातील. या निर्णयामुळे भोजनालयात जाऊन नाव विचारल्यामुळे होणारे वाद टाळता येतील, असा तर्क हरिभूषण ठाकूर यांनी मांडला आहे.
मध्य प्रदेशमध्येही होत आहे मागणी
हरियाणानंतर आता मध्य प्रदेशमध्येही अशीच मागणी केली जात आहे. येथील भाजपाचे आमदार रमेश मेंदोला यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्याकडे तशी मागणी केली आहे. कोणत्या व्यक्तीचे नाव ही त्याची ओळख असते. प्रत्येक लहान मोठे व्यापारी आणि दुकानदाराने दुकानासमोर आपले नाव लिहिणे बंधनकारक करावे, असे मेंदोलना म्हणाले आहेत.
दरम्यान, उत्तर प्रदेश सरकारच्या या निर्णयानंतर आता विरोधक आक्रमक झाले आहेत. या निर्णयामुळे योगी आदित्यनाथ सरकारकर टीका केली जात आहे.
हेही वाचा :
Video : मुलांच्या अंगावर कोसळली शाळेची भिंत, मन हेलावून टाकणारा प्रसंग कॅमेऱ्यात कैद!