NCP In Nagaland Election Results :  राज्यातील चिंचवड पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) पराभवाचा धक्का बसला असला तरी पक्षासाठी चांगली बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने नागालँड विधानसभा (NCP in Nagaland Assembly Election) निवडणुकीत दमदार कामगिरी केली आहे. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसने सहा जागांवर विजय मिळवला असून एका जागेवर आघाडीवर आहे. नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला विरोधी पक्ष म्हणून स्थान मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्वात मोठा विरोधी पक्ष ठरला आहे. तर, दुसरीकडे रामदास आठवले यांच्या पक्षाच्या दोन उमेदवारांचा विजय झाला आहे. तर, दोन ठिकाणी त्यांचे उमेदवार दुसऱ्या स्थानी राहिलेत. 


नागालँडमधील विधानसभा निवडणुकीत भाजपा-एनडीपीपी युतीने बहुमत मिळवले आहे. 60 जागांपैकी या आघाडीने 37 जागांवर विजय मिळवला आहे. त्यापैकी 25 जागांवर एनडीपीपीला आणि भाजपला 12 जागांवर विजय मिळला आहे. नागालँडमध्ये बहुमतासाठी 31 जागांची आवश्यकता आहे. 


2018 मध्ये काय स्थिती होती?


मागील 2018 मधील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने सहा जागांवर उमेदवार उभे केले होते. मात्र, एकाही जागांवर विजय मिळवता आला नाही. सगळ्याच जागांवर त्यांचे डिपॉझिट जप्त झाले होते. तर, भाजपने 20 जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यांना 12 जागांवर विजय मिळाला होता. काँग्रेसने 18 जागांवर विजय मिळवला होता. त्यांना एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. यंदाही त्यांची पाटी कोरली राहिली.


आठवले, नितीश कुमार आणि चिराग पासवान यांना यश 


नागालँडमध्ये चिराग पासवान यांच्या लोक जान्शकती पार्टीला (राम विलास) 2 जागांवर विजय मिळाला. चार जागांवर अपक्षांनी विजय मिळवला. नागा पीपल्स फ्रंटला दोन जागांवर विजय मिळाला आहे. सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास निवडणूक आयोगाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, एनडीपीपीला 32.33 टक्के मते मिळाली. तर, भाजपला 18 टक्के मते मिळाली. काँग्रेसला 3.54 टक्के मते मिळाली. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडला एका जागेवर विजय मिळाला. त्यांना 3.24 टक्के मते मिळाली. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या गटाला दोन जागांवर विजय मिळाला आहे.


मतदानाला चांगला प्रतिसाद


नागालँड विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी 83 टक्क्यांहून अधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आणि मतदान शांततेत पार पडले. 60 सदस्यीय नागालँड विधानसभेत 59 जागांवर उमेदवार उभे होते. भारतीय जनता पक्षाचे (भाजप) उमेदवार आणि विद्यमान आमदार काझेटो किनीमी यांनी झुन्हेबोटो जिल्ह्यातील अकुलुतो मतदारसंघातून बिनविरोध निवडणूक जिंकली आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :