Mamata Banerjee On Lok Sabha Elections 2024 : 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस पक्ष कुणासोबतही जाणार नाही. कोणत्याही पक्षासोबत युती करणार नसल्याची माहिती पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिली आहे. तृणमूलची युती जनतेसोबत असेल, असे ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले.
ममत बॅनर्जी यांनी गुरुवारी नवण्णा येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाची भूमिका कशी असेल, याबाबत वक्तव्य केले. त्या म्हणाल्या की, "मी 2024 लोकसभा निवडणुकीत कुणाशीही युती करणार नाही. तृणमूलची युती लोकांसोबत असेल." त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय या तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी केलेले वक्तव्य राजकीय वर्तुळातून चर्चेचा विषय ठरले आहे. कारण ममता म्हणाल्या, तृणमूलला काँग्रेस किंवा सीपीएमचे ऐकण्याची गरज नाही.
सागरदिघी पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. तृणमूलचा पराभव करून डाव्या-काँग्रेस आघाडीने विजय मिळवला. भाजपही तृणमूलच्या विरोधात डाव्या-काँग्रेस आघाडीला पाठिंबा देताना दिसत आहे. डाव्या-काँग्रेस आघाडीलाही यावेळी ममत बॅनर्जी यांनी 'अनैतिक' म्हटले आहे. भाजप, सीपीएम आणि काँग्रेस आपसात मतांची अदलाबदल करत असल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला. भाजपच्या मदतीने आपण आपल्याच विरोधात आहोत, असे म्हणता येईल का? असा सवालही यावेळी त्यांनी उपस्थित केला.
लोकसभा निवडणुकीला वर्षभराचा कालावधी राहिला आहे. त्यापूर्वी सर्व पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. काँग्रेस प्रणित युपीए आणि भाजप प्रणित एनडीए यांनी आपली तयारी सुरु केली आहे. त्याशिवाय देशातील काही महत्वाच्या नेत्यांनी तिसऱ्या आघाडीचे संकेत दिले आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीला रंग आला आहे.