Assembly Elections Result 2023: यंदाची नागालॅंडची निवडणूक (Nagaland Election) ही खऱ्या अर्थाने ऐतिहासिक ठरली  असून हेकानी जाखलू (Hekani Jakhalu) या महिला उमेदवाराने इतिहास रचला आहे. हेकानी जाखलू यांनी दिमापूर 3 या मतदारसंघातून विजय मिळवला असून त्या नागालँडच्या पहिल्या महिला आमदार ठरल्या आहेत. हेकानी जाखलू या नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पक्षाच्या उमेदवार असून त्यांनी एलजेपीच्या अॅझेतो झिमोमी यांचा 1536 मतांनी पराभव केला आहे. 


नागालँड राज्याच्या निर्मितीनंतर विधानसभा निवडणूक जिंकणाऱ्या (Assembly Elections Result 2023) हेकानी जाखलू या पहिल्या महिला ठरल्या आहेत. नागालँड हे 1963 मध्ये राज्य झाले आणि तेव्हापासून एकही महिला उमेदवार आमदार होऊ शकली नाही. दिमापूर 3 मतदारसंघातून हेकानी विजयी झाले आहेत. त्या. 47 वर्षीय हेकानी यांनी सॅन फ्रान्सिस्को विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली आहे.


हकानी यांना राष्ट्रपतींच्या हस्ते नारी शक्ती पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. दिमापूर 3 च्या जागेबद्दल बोलताना जाखलू यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात युवा विकास, महिला सक्षमीकरण, अल्पसंख्याकांचे हक्क आणि मॉडेल मतदारसंघासाठी एक ब्लू प्रिंट तयार केली आहे. निवडणूक जिंकणे ही पहिली लढाई आपण जिंकलो असून आता महिला आणि अल्पसंख्यांक समूदायासाठी काम करणार असल्याचं हेकानी यांनी सांगितलं आहे. 


41 लाखांचे कर्ज आणि सहा गाड्या


हेकानी जाखलू याच्यावर जवळपास 42 लाखांचं कर्ज असल्याचं त्यांनी प्रतिज्ञापत्रकात नमूद केलं आहे.  निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार हेकानी आणि त्यांच्या पतीकडे सहा गाड्या आहेत. त्याची एकूण किंमत 1.32 कोटींहून अधिक असल्याचे सांगण्यात आले आहे. हेकानी यांच्याकडे टोयोटा इनोव्हा कार आहे. प्रतिज्ञापत्रात त्यांच्या पतीच्या मालकीच्या पाच वेगवेगळ्या कारची यादी केली आहे.


83 टक्क्यांहून अधिक मतदान


नागालँड विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी 83 टक्क्यांहून अधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आणि मतदान शांततेत पार पडले. 60 सदस्यीय नागालँड विधानसभेत 59 जागांवर उमेदवार उभे होते. भारतीय जनता पक्षाचे (भाजप) उमेदवार आणि विद्यमान आमदार काझेटो किनीमी यांनी झुन्हेबोटो जिल्ह्यातील अकुलुतो मतदारसंघातून बिनविरोध निवडणूक जिंकली आहे. 


दरम्यान, ईशान्य भारतातील त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय या तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल आता जवळपास स्पष्ट झाले आहेत. त्रिपुरामध्ये (Tripura Election 2023) भाजप (BJP) पूर्ण बहुमताने पुन्हा सत्तेत येणार आहे. दुसरीकडे नागालँडमध्ये भाजप आणि त्यांचा सहयोगी नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पक्ष बहुमताने सरकार स्थापन करताना दिसत आहे. तर मेघालयमध्ये (Meghalaya Election 2023) त्रिशंकू विधानसभा होण्याची शक्यता आहे.


ही बातमी वाचा: