नवी दिल्ली : टाटा सन्सच्या अध्यक्षपदी एन. चंद्रशेखरन यांची वर्णी लागली आहे. सायरस मिस्त्री यांना हटवल्यानंतर तात्पुरत्या काळासाठी स्वत: रतन टाटा यांनी टाटा सन्सच्या अध्यक्षपदाची जबाबदारी घेतली होती. अखेर तीन महिन्यातच नव्या अध्यक्षांची घोषणा करण्यात आली आहे. यापुढे एन. चंद्रशेखरन टाटा सन्सचे नवे अध्यक्ष असतील.
एन. चंद्रशेखरन हे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे (TCS) सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. टाटा ग्रुपमधील सर्वात तरुण सीईओ म्हणूनही एन. चंद्रशेखर यांच्याकडे पाहिलं जातं.
सायरस मिस्त्री यांना अध्यक्षपदावरुन हटवल्यानंतर एन. चंद्रशेखरन यांना 'टाटा'च्या संचालक मंडळात घेण्यात आले होते. टीसीएसमध्ये 2009 सालापासून ते मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत होते. त्यानंतर आता टाटा सन्सच्या अध्यक्षपदाची जबाबदारी एन. चंद्रशेखरन यांच्याकडे देण्यात आली आहे.
एन. चंद्रशेखरन यांच्या कार्यकाळात टीसीएसची चांगली प्रगती झाल्याने टाटा सन्सचं अध्यक्षपद त्याच कामाची पावती असल्याचेही बोलले जात आहे.
विशेष म्हणजे 'टाटा'च्या 15 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच बिगर-पारशी व्यक्ती निवडण्यात आली आहे.