नवी दिल्ली: पंजाब आणि गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने 46 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात पंजाबमध्ये जिथे भाजप 23 जागांवर विधानसभेची निवडणूक लढवत आहे त्यापैकी 17 जागांचा या यादीत समावेश आहे. तर दुसरीकडे गोवा विधानसभा निवडणुकीसाठी ही 29 उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे.
केंद्रीय मंत्री जे.पी नड्डा यांनी आज दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन दोन्ही राज्यांसाठीची ही पहिली यादी जाहीर केली. दरम्यान, पंजाबसाठी जाहीर झालेल्या यादीतील विद्यमान 12 आमदारांपैकी विद्यमान मंत्र्यांची नावे वगळण्यात आली आहेत.
या दोन्ही राज्यांमध्ये 4 फेब्रुवारी रोजी पहिल्या टप्प्यात निवडणूक होत आहे. भाजपने 23 जागांवर आपले उमेदवार उतरवले आहेत. तर इतर जागांवर भाजपचा सहकारी पक्ष शिरोमणी अकाली दल निवडणूक लढवणार आहेत.
विधानसभेसोबतच अमृतसरमधील पोटनिवडणुकीसाठीही भाजपने आपल्या उमेदवाराची घोषणा केली आहे. अमृतसरमधून भाजपने राजेंद्र मोहन चीना यांना पोटनिवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत अर्थमंत्री अरुण जेटली यांना काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्याकडून पराभव सहन करावा लागला. यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी आपल्या लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने, या जागेसाठी पुन्हा मतदान होत आहे. सध्या काँग्रेसतर्फे कॅप्टन अमरिंदर सिंह यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे केले जात आहे.
गोव्यातील 40 जागांसाठी होणाऱ्या विधासभा निवडणुकीत भाजप सर्वाधिक जागांवर निवडणूक लढवणार आहे. भाजपने आज 40 पैकी 29 जागांसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यावेळी सेफ गेम खेळून 70 टक्के विद्यमान आमदारांनाच तिकीट वाटप केले गेले. यामध्ये 11 नव्या नावांचाही समावेश आहे. ज्यामध्ये मूरगावमधून संकल्प आमोंडकर, सावर्डेमधून शंकर किरलपालकर, सांगेमधून सावित्री कवळेकर यांचा समावेश आहे.
राज्याचे विद्यमान क्रीडा मंत्री रमेश तावडेकर आणि विधानसभा अध्यक्ष अनंत शेठ यांच्या नावाची अद्यप घोषणा झाली नसली, तरी दुसऱ्या यादीत यांची नावे असतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच विधासभेचे उपसभापती विष्णू वाघ यांच्या प्रकृती अस्वस्थामुळे त्यांचे बंधू रामाराव वाघ यांवना सांत आंद्रेमधून निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेशच्या निवडणुकीतील भाजप उमेदवारांसाठी पक्षाच्यावतीने १५ जानेवारी रोजी पक्षाची बैठक होण्याची शक्यता आहे.