मुंबई : ‘गुजरात निवडणुकीपूर्वी राहुल गांधींची भेट टाळणं ही सर्वात मोठी चूक होती,’ अशी कबुली पाटीदार नेता हार्दिक पटेल याने दिली आहे. इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये तो बोलत होता.
हार्दिक पटेल म्हणाला की, “गुजरात निवडणुकीपूर्वी मी राहुल गांधीची भेट घ्यायला पहिजे होती. जर ती भेट झाली असती, तर भाजपला सत्तेपासून दूर ठेवता आले असते. तसेच, गुजरातमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं असतं.”
तो पुढे म्हणाला की, “जर मी ममता बँनर्जी, नितीश कुमार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना जाहीरपणे भेटू शकतो. तर राहुल गांधीची भेट घेण्यात मला काहीही अडचण नव्हती. पण ती भेट मी टाळली.”
ही भेट टाळणं आपली सर्वात मोठी चूक असल्याचं सांगून हार्दिक पटेल पुढे म्हणाला की, “जर ती भेट झाली असती तर भाजपला 99 ऐवजी 79 जागांवरच समाधान मानावं लागलं असतं.”
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना हार्दिक पटेल म्हणाला की, “2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने नरेंद्र मोदींचं नाव जाहीर केले, त्यावेळी आम्हाला वाटलं की, या देशातील तरुणांना रोजगार मिळेल. या देशातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला योग्य हामीभाव मिळेल. पण त्यातील एकही आश्वासन पूर्ण झालेलं नाही.”
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये गुजरात विधानसभेसाठी निवडणुका झाल्या. 182 जागांसाठी झालेल्य या निवडणुकीत भाजपला 99 जागांवर विजय मिळाला. या निवडणुकीत काँग्रेसच्या जागा वाढल्या, तरी भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे काँग्रेसला जमले नाही.