लखनौ : संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'पद्मावत' चित्रपट पाहताना अल्लाऊद्दीन खिलजीचं पात्र पाहून मला समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांची आठवण आली, असं वक्तव्य माजी खासदार आणि प्रख्यात अभिनेत्री जयाप्रदा यांनी केलं आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील रामपूर मतदारसंघातून जयाप्रदा यांनी निवडणूक लढवली होती. 'निवडणुकीच्या वेळी आझम खान यांनी मला खूप त्रास दिला होता. त्यामुळे खिलजीला पाहिल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर आझम खानच आले', असं जयाप्रदा म्हणाल्या.

आझम खान यांनी उद्धट वर्तन आणि लबाडी केल्याचा आरोपही जयाप्रदा यांनी केला. आझम खान यांनी 2009 मध्ये आपली प्रतिमा मलीन करण्यासाठी अश्लील फोटोंचं वाटप केल्याचा दावाही त्यांनी केला. जयाप्रदांनी आझम खान यांचा उद्धटपणा जिरवण्याची शपथ 2009 मध्ये घेतली होती. त्यानंतर दोघांमधील कटुता सर्वांसमोर आली.


पद्मावत चित्रपटात अभिनेता रणवीर सिंगने अल्लाऊद्दीन खिलजीची व्यक्तिरेखा साकारली होती. तेराव्या शतकात दिल्लीच्या तख्तावर बसलेला खिलजीची क्रूरकर्मा अशी ख्याती होती.