नवी दिल्ली : हवाई वाहतूक मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांना देण्यात आला आहे. टीडीपी मंत्री अशोक गजपती राजू यांच्या राजीनाम्यानंतर हा बदल करण्यात आला.


तेलुगू देसम पक्षाने काही दिवसांपूर्वी एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला होता. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी याबाबत घोषणा केली होती. त्यानंतर अशोक गजपती राजू आणि वाय. एस. चौधरी या दोन्ही केंद्रीय मंत्र्यांनीही राजीनामे दिले.

विशेष म्हणजे सुरेश प्रभू हे आंध्र प्रदेश मधून टीडीपीच्याच पाठिंब्यावर राज्यसभेवर निवडून आले होते. यूपीएच्या काळात प्रफुल्ल पटेल यांच्यानंतर एनडीएतही हे खातं मराठी माणसाकडे देण्यात आलं आहे.

अशोक गजपती राजू यांच्या राजीनाम्यानंतर हवाई वाहतूक मंत्रालयांचा अतिरिक्त कार्यभार पंतप्रधान मोदींकडे देण्यात आला होता. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्वीट करुन तशी माहिती दिली होती. मात्र आता ही जबाबदारी प्रभूंकडे सोपवण्यात आली आहे.


आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा दिला जाऊ शकत नाही, असं अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केल्यानंतर चंद्राबाबूंच्या राजकीय हालचाली वाढल्या होत्या आणि अखेर त्यांनी एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घोषित केला.

तेलंगणा आणि आंध्रच्या विभाजनावेळी आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्याचं वचन दिलं होतं. त्यावेळी विशेष राज्याचा दर्जा देण्याची तरतूद होती. मात्र 14 व्या वित्तीय आयोगाच्या अहवालानुसार अशाप्रकारे दर्जा देऊ शकत नाही, असं जेटलींनी सांगितलं. अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्त्वात एनडीएच्या स्थापनेपासून टीडीपी एनडीएमध्ये होती.

सुरेश प्रभू यांच्याकडे नोव्हेंबर 2014 पासून रेल्वे मंत्रालयाची जबाबदारी होती. मात्र सप्टेंबर 2017 मध्ये झालेल्या फेरबदलानंतर सुरेश प्रभूंचं रेल्वे मंत्रालय पियुष गोएल यांना देण्यात आलं, तर सुरेश प्रभूंकडे वाणिज्य मंत्रालयाची धुरा देण्यात आली.

संबंधित बातम्या :


चंद्राबाबूंचा टीडीपी एनडीएतून बाहेर


शिवसेनेच्या प्रेरणेमुळेच टीडीपी एनडीएतून बाहेर: संजय राऊत