लखनौ : उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यातील एका मुस्लीम महिलेला तिच्या पतीने यासाठी तलाक दिला, कारण ती पंतप्रधान मोदींच्या समर्थनार्थ आयोजित सभेला गेली होती. पतीने तिहेरी तलाक दिल्यानंतर, संबंधित महिलेने केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांची बहीण फरहत नकवी यांच्याकडे न्यायासाठी दाद मागितली आहे.
बरेली जिल्ह्यातील किलामधील इंग्लिशंगज मौहल्ल्यात ही घटना घडली.
7 डिसेंबर रोजी केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांची बहीण फरहत नकवी यांच्या ‘मेरा हक फाऊंडेशन’च्या वतीने बरेलीमध्ये ‘धन्यवाद रॅली’चं आयोजन केलं होतं. या रॅलीमध्ये अनेक मुस्लीम महिला सहभागी झाल्या होत्या. या रॅलीसाठी पीडित महिला सायरा खान ही देखील उपस्थित होती.
रॅली संपल्यानंतर ती जेव्हा घरी गेली, त्यावेळी तिच्या पती दानिश खानने तिच्यासोबत मुलांनाही मारहाण केली. यानंतर तिला तिहेरी तलाक देऊन, मुलांसोबत घराबाहेर काढलं.
दरम्यान, पीडित महिला आणि तिच्या पतीमध्ये गेल्या तीन-चार दिवसांपासून सतत वाद होत आहेत. पण 7 डिसेंबर रोजी सायरा पंतप्रधान मोदींच्या समर्थनार्थ आयोजित धन्यवाद रॅलीसाठी जाऊन घरी आली. त्यानंतर तिच्या पतीने तिला मारहाण करुन तिला तिहेरी तलाक दिला.
दुसरीकडे दानिशने सायराचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. शिवाय, तिचे इतर कोणासोबत तरी अनैतिक संबंध असल्याचाही आरोप दानिशने केला आहे. तसेच सायराचे काका आपल्याला मानसिक त्रास देत असल्याचा आरोप केला आहे.
त्याने म्हटलंय की, "पंतप्रधान मोदींच्या सभेला गेल्याने सायराला तलाक दिला नाही, तर पत्नीच्या वर्तणुकीमुळे आपण तिला तलाक दिला आहे. तसेच, जिन्स आणि इतर अधुनिक कपडे परिधान करण्यास मनाई करुनही, ती ते परिधान करत होती. शिवाय, तिच्या कुटुंबियांकडूनही आपल्याला मानसिक त्रास दिला जात आहे."
पंतप्रधान मोदींच्या समर्थनार्थ आयोजित सभेला गेल्याने पतीकडून ‘तलाक’
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Dec 2017 12:24 PM (IST)
पंतप्रधान मोदींच्या समर्थनार्थ आयोजित धन्यवाद रॅलीला उपस्थित राहिल्याने, एका मुस्लीम व्यक्तीने आपल्या पतीला तिहेरी तलाक दिला आहे. बरेली जिल्ह्यातील्या किलामधील इंग्लिशगंज मौहल्ल्यात ही घटना घडली.
फोटो सौजन्य : ANI
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -