नवी दिल्ली : गुजरात विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान 14 डिसेंबरला होईल. गुजरातवर झेंडा कुणाचा याचा निर्णय 18 डिसेंबरला होणार आहे. मात्र त्यापूर्वी काँग्रेसच्या पराभवाची घोषणा करणारं काँग्रेसचंच पत्र व्हायरल होत आहे.


काँग्रेस नेत्यानेच हे पत्र काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नावाने लिहिल्याचा दावा करण्यात येत आहे, ज्यामध्ये गुजरात निवडणुकीत भाजपचा विजय आणि काँग्रेसचा पराभव झाल्याची घोषणा करण्यात आली आहे. जागांचं गणितही यामध्ये सांगण्यात आलं आहे.

या पत्रात लिहिलेलं आहे त्यानुसार, काँग्रेसला 50 ते 60 जागा मिळतील. तर भाजपला 130 ते 140 जागा मिळण्याचा दावा करण्यात आला आहे. पत्राच्या दुसऱ्या ओळीत प्रदेशाध्यक्ष म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. त्यानुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भरत सिंह सोलंकी यांचं नाव असणं अपेक्षित होतं, कारण भरत सिंह सोलंकी गुजरात काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आहेत.

या सर्व प्रकाराची पडताळणी करण्यासाठी एबीपी न्यूजने काँग्रेस नेते पवन खेडा यांच्याशी बातचीत केली. मात्र हे पत्र बनावट असल्याचा दावा त्यांनी केला. शिवाय यामध्ये केलेली भरत सिंह सोलंकी यांची स्वाक्षरीही बनावट असून हे पत्र हास्यास्पद असल्याचं त्यांनी सांगितलं.

काँग्रेसमध्ये पक्षातील संवादासाठी अशा प्रकारच्या कोणत्याही पत्राचा वापर केला जात नाही, असं पवन खेडा यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी केलेल्या चर्चेच्या आधारावर गुजरातमध्ये काँग्रेसचा पराभव जाहीर करणारं पत्र बनावट असल्याचं एबीपी न्यूजच्या पडताळणीत सिद्ध झालं आहे.