Yadadri Sri Lakshmi Narasimha Swamy Temple : अखेर सहा वर्षांच्या दिर्घकाळानंतर तेलंगणामधील प्रसिद्ध श्री लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिर  भाविकांसाठी पुन्हा खुलं करण्यात आलं आहे. हे पुरातन मंदिर पुनर्बांधणीसाठी मागील सहा वर्षे बंद होतं. ड्रीम प्रोजेक्ट मानल्या जाणाऱ्या या मंदिराच्या पुर्नबांधणासाठी 1800 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. सोमवारी 28 मार्च रोजी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या हस्ते मंदिरात पूजा पार पडली. त्यानंतर हे मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. नूतनीकरण केलेले मंदिर पुन्हा उघडण्याची वेळ केसीआरचे आध्यात्मिक गुरू चिन्ना जेयार स्वामी यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येच ठरवली होती. 






भाविकांसाठी मंदिर पुन्हा उघडण्यापूर्वी मंदिरात यज्ञ पार पडला. यावेळी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यासह अनेक दिग्गज नेते आणि अधिकारी उपस्थित होते. श्री लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिराच्या नुतनीकरणासाठी सुमारे 1800 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या मंदिराची पुनर्बांधणी हा मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता. 






मंदिराचे वैशिष्ट्य काय?


सुंदर वास्तुकला हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. काळ्या ग्रॅनाइटमध्ये करण्यात आलेले शिल्पकाम स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. मंदिराचे मुख्य आकर्षण म्हणजे 'प्रल्हाद चरित्र', ज्यात 'भक्त प्रल्हाद'च्या जन्मापासून ते हिरण्यकशिपूच्या वधाची कथा शिल्पकलेच्या आधारे दाखवण्यात आली आहे. 'प्रल्हाद चरित्र' हे सोन्याने बनलेले आहे. यामध्ये हिरण्यकशिपूला मारण्यासाठी नरसिंहाने खांब फोडून राक्षस राजाची छाती फाडल्याचं शिल्प देखील आहे.


या मंदिराच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री, राज्यपाल, मंत्री आणि हिंदू धर्मातील सर्व संप्रदायातील संतांना यज्ञासाठी आमंत्रित करण्याची आधी योजना होती. मात्र कोरोनामुळे हा कार्यक्रम मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला. यदाद्री येथील श्री लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिर हैदराबादपासून 80 किमी अंतरावर आहे. मंदिर परिसर 14.5 एकरमध्ये पसरलेला आहे. या मंदिराच्या पुनर्बांधणीचे काम 2016 साली सुरू झाले, त्यासाठी सुमारे 1600 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. संपूर्ण मंदिर प्रकल्प 2500 एकरमध्ये पसरलेला आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha