मुंबई : मुंबई आणि उपनगरात काल रात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने आता कुठे उसंत घेतल्याचं दिसून येतंय. पावसामुळे अनेक भागात पाणी साचल्यामुळे रेल्वे सेवेवर परिणाम झाला. सकाळी कल्याण ते मुंबई दरम्यान रेल्वे सेवा ठप्प होती, त्यामुळे अनेक एक्सप्रेस आणि मेल गाड्या कल्याण स्टेशनवर थांबवण्यात आल्या होत्या. आज धावणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
जोरदार पावसामुळे रेल्वेच्या वाहतुकीवर देखील परिणाम झाला आहे. रेल्वेच्या दक्षिण विभागातील पालघाट इथल्या पडिल ते कुलखेकर दरम्यान माती रूळावर आल्याने लांब पल्ल्याच्या दोन ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये 06163 लोकमान्य टिळक टर्मिनस ते कोचिवेल्ली या पंधरावड्यातून एकदा धावणाऱ्या ट्रेनचा समावेश आहे. शिवाय, 06345 लोकमान्य टिळक ते तिरूवनंतपुरम या गाडीचा समावेश आहे.
मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सुरु असल्यामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले आहे. सध्या विशेष एक्सप्रेस धावत असलेल्या गाड्या रद्द किंवा आंशिक रद्द करण्यात आल्या आहेत त्या खालील प्रमाणे आहे.
1. गाडी क्रमांक 01027 दादर- पंढरपूर विशेष एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.
2. गाडी क्रमांक 02207 मुंबई-लातूर विशेष एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.
3. गाडी क्रमांक 01139 मुंबई गदग विशेष एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.
4. गाडी क्रमांक 02702 मुंबई- हैदराबाद विशेष एक्सप्रेस ही गाडी मुंबई स्थानकाऐवजी ठाणे स्थानकावरून आपल्या निर्धारित वेळेवर सुटेल.
5. गाडी क्रमांक 02702 हैद्राबाद-मुंबई विशेष एक्सप्रेस ठाणे स्थानकापर्यंत धावेल आणि सदर गाडी, गाडी क्रमांक 07031 मुंबई हैदराबाद विशेष एक्सप्रेस म्हणून आपल्या निर्धारित वेळेत सुटेल.
6. गाडी क्रमांक. 01014 कोईमतुर- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष एक्सप्रेस कोईमतुर स्थानकावरून आपल्या निर्धारित वेळेत म्हणजे सकाळी 08.55 वाजता सुटण्याऐवजी सदर गाडी दुपारी 12.15 वाजता सुटली.
वरील गाड्या रद्द झाल्याचे लक्षात घेऊन प्रवाशाने रेल्वे प्रशासनाने सहकार्य करावे असं आवाहन वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक जनसंपर्क अधिकारी, सोलापूर मध्य रेल्वे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
पावसाचा परिणाम हा रस्ते वाहतुकीवरही झाला आहे. मुसळधार पावसाने भुईबावडा घाटात पुन्हा दरड कोसळली असून त्यामुळे कोल्हापूरहून कोकणाकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. करूळ घाटातही रस्ता खचल्याने वाहतुकीसाठी 26 जुलै पर्यंत यापूर्वीच बंद करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या :