Google Doodle : देशातील पहिल्या महिला डॉक्टर्सपैकी एक असलेल्या कादंबरी गांगुली यांच्या 160 व्या जन्मतिथीच्या निमित्ताने गुगलने आपल्या डूडलच्या माध्यमातून त्यांच्या कार्याला सलाम केला आहे. आजच्या गुगल डूडलवर डॉ. कादंबरी गांगुली यांचा फोटो झळकला आहे. कादंबरी गांगुलींचा जन्म 18 जुलै 1861 साली झाला होता आणि 1884 साली कोलकाता मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेणाऱ्या त्या देशातील पहिल्या महिला होत्या. त्या काळात एखाद्या महिलेने वैद्यकीय शिक्षणासाठी कॉलेजमध्ये प्रवेश घेणं म्हणजे दुर्मिळ होतं.


 




महाराष्ट्रातील आनंदीबाई जोशी या देशातील पहिल्या महिला डॉक्टर मानल्या जातात. त्यांचा अकाली मृत्यू झाल्याने त्यांची कार्याची छाप म्हणावी तितकी उमटली नाही. पण कादंबरी गांगुली यांनी मात्र रुग्णांची सेवा करुन वैद्यकीय क्षेत्रात आपल्या कार्याची अन्यसाधारण छाप उमटवली. 


कादंबरी गांगुली या 1886 साली दक्षिण आशियातील युरोपियन मेडिसिनमध्ये ट्रेन होणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर होत्या. कादंबरी गांगुली यांनी वैद्यकीय क्षेत्रासोबतच सामाजिक क्षेत्रातही ठसा उमटवला. राष्ट्रीय काँग्रेसच्या व्यासपीठावर येणाऱ्या त्या पहिल्या महिल्या होत्या. 


स्त्री रोग तज्ज्ञ म्हणून करियर सुरु
कादंबरी गांगुली या 1892 साली ब्रिटनमध्ये गेल्या आणि डबलिन, ग्लासगो आणि एडनबर्ग मध्ये ट्रेनिंग घेतलं. तिथून परत आल्यानंतर त्यानी स्त्री रोग तज्ज्ञ म्हणून  आपल्या करियरला सुरुवात केली. त्यांनी कोलकात्याच्या लेडी डफरिन रुग्णालयात काम सुरु केलं आणि शेवटपर्यंत त्या ठिकाणी आपल्या प्रॅक्टिस सुरु ठेवलं. कादंबरी गांगुली यांचे निधन 3 ऑक्टोबर 1923 साली झाले.


सामाजिक आणि सास्कृतिक जीवनात पुरुषांचा प्रचंड प्रभाव असताना कादंबरी गांगुली यांनी वैद्यकीय क्षेत्रात करियर करुन स्त्रियांच्या मुक्तीचा मार्ग प्रशस्त केला. कादंबरी गांगुली या ब्राम्हो समाजाचे नेते द्वारकानाथ गांगुली यांच्या पत्नी होत्या. 


संबंधित बातम्या :