Corona Update : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताच आहे. अशातच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका वाढताच आहे. देशात दोन दिवसांनी पुन्हा एकदा 40 हजारांहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. रविवारी सकाळी आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 41,157 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तसेच 518 कोरोना रुग्णांनी जीव गमावला आहे. यापूर्वी शनिवारी 38,079 आणि शुक्रवारी 38,949 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. गेल्या 24 तासांत 42,004 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
कोरोनाबाधितांचा एकूण आकडा :
देशातील सक्रिय कोरोनाबाधितांचा आकडा सध्या 4 लाखांहून अधिक आहे. एकूण 4 लाख 22 हजार लोकांना सध्या कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत तीन कोटी 11 लाख 6 हजार रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 13 हजार 609 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, 3 कोटी 2 लाख 69 हजार रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत.
40 कोटींहून अधिक वॅक्सिनचे डोस देण्यात आले
आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, 17 जुलैपर्यंत देशभरात 40 कोटी 49 लाख 31 हजार कोरोना लसींचे डोस देण्यात आले आहेत. काल दिवसभरात 51 लाख 1 हजार लसीचे डोस देण्यात आले आहेत. तसेच आयसीएमआरनं दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 44 कोटी 39 लाख कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात 19.36 कोरोना सॅम्पल्स टेस्ट करण्यात आल्या. ज्याचा पॉझिटिव्हिटी रेट 3 टक्क्यांहून कमी आहे.
तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी महाराष्ट्राचं मिशन 100 डेज कसं असेल?
कोरोना संकटाच्यादृष्टीनं देशात पुढचे 100 दिवस अत्यंत महत्वाचे आहे. कोरोनाच्या तियस-या लाटेला रोखण्याकरता पुढचे 100 ते 125 दिवस खबरदारी घेणं गरजेचं आहे असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलंय. देशाची कोरोनाविषयक चिंता वाढवणा-या सहा राज्यांमध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे. त्यामुळे इथुन पुढे सर्वच यंत्रणांकरता मिशन 100 डेज महत्वाचं आहे.
महाराष्ट्र, केरळ, ओडिशा, तमिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश या सहा राज्यांमधील पुढचे शंभर दिवस कसे असतील याकडे अख्ख्या देशाचं लक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना आढावा बैठकीत या सहा राज्यांमधल्या रुग्णसंख्या वाढीविषयी चिंता व्यक्त केली आहे. पुढच्या 100 दिवसांत या सहा राज्यांनी कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवली तर देशासमोरचं तिस-या लाटेचं संकट टळू शकेल.
जशी देशाची काळजी महाराष्ट्र आणि दक्षिणेतल्या 5 राज्यांनी वाढवलीय, तसंच महाराष्ट्रालाही 8 जिल्ह्यांनी चिंतेत टाकलंय. या 8 जिल्ह्यांचा कमी न होणा-या पॉझिटीव्हीटी रेट धडकी भरवणारा आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :