मुंबई: काँग्रेसच्या काळात झालेल्या पेट्रोल डिझेल दरवाढीवर टीका करणारे बॉलिवूड कलाकार आता इलेक्ट्रिक कार चालवतात का असा उपरोधिक टोला मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगतापांनी लावलाय. आज पेट्रोल डिझेलच्या किंमतीची वाटचाल शंभरीकडे सुरु असताना हे कलाकार शांत का आहेत असाही सवाल त्यांनी केलाय.


केंद्रात डॉ. मनमोहन सिंग सरकार असताना पेट्रोल डिझेल दरवाढ झाल्यावर अमिताभ बच्चन, अक्षय कुमार आणि अनुपम खेर यांनी सरकारवर टीका केली होती. या कलाकारांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यावेळी सरकारवर टीका केली होती. त्यामध्ये अमिताभ बच्चन यांनी रामायणाचा दाखला दिला होता आणि म्हणाले होते की गाड्या कॅशमध्ये खरेदी करता येतील पण त्यात पेट्रोल टाकण्यासाठी कर्ज काढावे लागेल.






मुंबईच्या फुटपाथवर चक्क पेट्रोल पंप, अवैध पद्धतीनं विकलं जात होतं डिझेल


अभिनेता अक्षय कुमारने सरकारवर उपरोधिक टीका करताना आता सायकल चालवण्याची वेळ आली आहे असं सांगितलं होतं. तर अनुपम खेर यांनी एक जोक शेअर करुन सरकारच्या पेट्रोल डिझेल दरवाढीची खिल्ली उडवली होती.


मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगतापांनी आता या कलाकारांचे हे जुने ट्वीट शेअर करुन या कलाकारांवर टीका केली आहे. पेट्रोल डिझेलच्या किंमती शंभरीकडे वाटचाल करत असताना हे कलाकार आता इलेक्ट्रिक कार चालवत आहेत का असा सवाल भाई जगतापांनी केला आहे.


देशात पेट्रोलच्या आणि डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ होताना दिसत आहेत. काही शहरात या किंमती लवकरच शंभरी पार करतील असं दिसून येतंय.


मोदी सरकारने देशाचं आणि घराचं बजेट बिघडवलं; राहुल गांधींचा हल्लाबोल