Uttarakhand Glacier Burst देशात आजवर अनेकदा नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तीचं संकट ओढावलं आहे. या संकटसमयी काही व्यक्ती हे जणू देवदूतासारखेच मदतीचा हात पुढे करत मोलाचं सहकार्य करुन गेले आहेत. कोणतंही नातं नसताना, कसलीही अपेक्षा नसताना एका माणुसकीच्या बळावरही हे सारं साध्य होतं. अर्थात हा त्यांच्या कामाचा भागही असतो. पण, यामध्ये कामातील समर्पकता साऱ्यांचंच मन जिंकून जाते. ही अशी ओळख सध्या करुन दिली जात आहे ती म्हणजे आयटीबीपी म्हणजेत इंडो- तिबेटन बॉर्डर पोलीस फोर्स या चमूची.


रविवारी उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यामध्ये एक हिमकडा कोसळला आणि पाहता पाहता निसर्गानं भयावह रुप धारण केलं. क्षणार्धात चित्र पालटलं, मनाला भावणाऱ्या डोंगररांगा धडकी भरवू लागल्या. हिमकडा कोसळल्यामुळं पाण्याचा एकच लोट आला, ज्यामध्ये अनेक प्रकल्पांवर काम करणारे मजूरही वाहून गेले, किनाऱ्यालगत असणाऱ्या बहुतांश भागाचंही नुकसान झालं.


Uttarakhand | 'देवभूमी'त याआधीही कोपलेला निसर्ग; पाहा केव्हा घडलेल्या त्या घटना


संकटाचं हे रुप पाहताच एनडीआरएफ, आयटीबीपी आणि स्थानिक यंत्रणांकडून वेगानं बचावकार्य सुरु करण्यात आलं. युद्धपातळीवर सुरु असणाऱ्या याच बचावकार्यादरम्यान आयटीबीपीच्या जवानांनी तपोवन धरणापाशी असणाऱ्या एका बोगद्यातून जवळपास 15-16 जणांना सुखरुप बाहेर काढलं. एएनआयया वृत्तसंस्थेनं या क्षणांचा व्हिडीओ पोस्ट केला.


एका व्हिडीओमध्ये जवान चिखल आणि मातीनं भरेलेल्या बोगद्यात अडकलेल्यांना बाहेर काढताना दिसत आहेत. याच व्हिडीओमध्ये मृत्यूला चकवून बाहेर आलेल्यांच्या भावनाही अनावर झाल्याचं स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. त्यांना पाहून, या जवानांच्या चेहऱ्यावरही हास्य खुलल्याचं दिसत आहे. तर, दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये 'बोलो बद्री विशाल की जय, ITBP की जय' असं म्हणत जवानांचा उत्साह द्विगुणित करत त्यांच्या कार्याला सलाम केला जात असल्याचंही कळून येत आहे.








संकटसमयी धावून आलेल्या या देवदूतांना सोशल मीडिया म्हणू नका किंवा मग इतरही सर्वत क्षेत्र, साऱ्यांकडूनच सलाम केला जात आहे.