नवी दिल्ली: केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्तार अब्बास नकवी यांच्या राज्यसभेच्या खासदारकीची टर्म उद्या संपणार असल्याने त्यांनी आज पंतप्रधानांकडे आपल्या मंत्रिपदाचा राजीमाना सुपूर्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी राजीनामा दिल्याचं सांगितलं जातंय. मुख्तार अब्बास नकवी हे भाजपचा अल्पसंख्याक विभाग सांभाळत असून त्यांना आता मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. एनडीएकडून उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार किंवा राज्यपालपदी त्यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


 




मुख्तार अब्बास नकवी हे आजच्या त्यांच्या शेवटच्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये सामिल झाले होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या योगदानाचे कौतुक केलं. केंद्रीय स्टील मंत्री आरसीपी सिंह यांचीही आजची शेवटची कॅबिनेट बैठक होती. या दोन्हील मंत्र्यांना निरोप देताना त्यांचे योगदान हे कायम लक्षात राहिल अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे कौतुक केलं. या दोन्ही मंत्र्यांचा राज्यसभेची टर्म 7 जुलै रोजी संपत आहे. 


काहीच दिवसांपूर्वी झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपने मुख्तार अब्बास नकवी यांना उमेदवारी दिली नव्हती. त्यामुळे त्यांना आता मोठी जबाबदारी देण्यात येईल अशी चर्चा दिल्लीतील राजकीय वर्तुळामध्ये आहे. कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसताना केंद्रीय मंत्रीपदी सहा महिने राहता येते. या सहा महिन्यामध्ये त्या मंत्र्याला राज्यसभा किंवा लोकसभा या दोन्हीपैकी एका सभागृहामध्ये निवडून जावं लागतं. अन्यथा त्याचे मंत्रिपद रद्द होतं. 


मुख्तार अब्बास नकवी हे 2010 ते 2016 मध्ये उत्तर प्रदेशमधून राज्यसभेचे खासदार म्हणून निवडले गेले होते. त्यानंतर 2016 साली त्यांना झारखंडमधून राज्यसभेमध्ये पाठवण्यात आलं. मुख्तार अब्बास नकवी हे 1998 साली सर्वप्रथम लोकसभेमध्ये निवडून आले होते. ते वाजपेयी सरकारमध्ये सूचना आणि प्रसारण मंत्री होते. 2016 साली नजमा हेपतुल्ला यांनी राजीनामा दिल्यानंतर केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्रीपदी त्यांची वर्णी लागली.


उपराष्ट्रपती किंवा राज्यपाल पदासाठी नाव चर्चेत
मुख्तार अब्बास नकवी यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता त्यांना उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार करण्यात येणार असल्याच्या चर्चा आहेत. तसे न झाल्यास त्यांना राज्यपाल म्हणून नियुक्त केलं जाईल अशी चर्चा आहे.