NDRF : सध्या राज्यासह देशात अनेक ठिकाणी धो धो पाऊस कोसळताना दिसत आहे. राज्यातही काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळं काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. दरवर्षी मुसळधार पावसामुळं अनेक ठिकाणी पूर येतो. यामुळं संपूर्ण जनजीवन विस्कळीत होतं. अशा वेळी पूर स्थितीतून नागरिकांची सुटका करण्यासाठी प्रथम धावून येतं ते NDRF चं पथक. भूकंप, महापूर, त्सुनामी, चक्रीवादळ आणि इतर नैसर्गिक आपत्तीवेळी NDRF दलाला पाचारण केलं जातं. NDRF (National Disaster Response Force) म्हणजेचं राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल. 


NDRF म्हणजे काय?


बऱ्याच वेळा पूरस्थितीत, भूकंप किंवा चक्रीवादळ अशा स्थितीत नागरिकांच्या मदतीला  NDRF चे जवान येतात. या दलाचे जवान पूर किंवा आपत्तीने ग्रस्त असलेल्या ठिकाणच्या नागरिकांचे प्राण वाचवतात. पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की NDRF म्हणजे नेमकं काय? NFRD चे पूर्ण नाव हे 'राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आहे. एनडीआरएफ ही एक अशी शक्ती आहे की, जी नैसर्गिक आपत्ती असताना काम करते. जसे की भूकंप, पूर यासारख्या परिस्थितीत, एनडीआरएफ फोर्सची एक टीम तयार केली जाते. संकटात सापडलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी त्या टीमला पाठवलं जातं. यामध्ये तीन बीएसएफ, दोन सीआरपीएफ, दोन सीआयएसएफ, दोन आयटीबीपी आणि दोन एसएसबी जवानांचा समावेश असतो. जिथे जिथे कोणत्याही प्रकारची नैसर्गिक आपत्ती येते तिथे ही टीम अडकलेल्या लोकांसाठी मदत कार्य करते. NDRF हे 12 बटालियनचे एक दल आहे.


भारताच्या निमलष्करी दलातील प्रतिनियुक्तीवरील व्यक्तींद्वारे हे काम चालते. तीन सीमा सुरक्षा दल, तीन केंद्रीय राखीव पोलीस दल, दोन केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, दोन इंडो-तिबेट सीमा पोलीस, दोन सशस्त्र सीमा बल आणि एक आसाम रायफल्स. प्रत्येक बटालियनची एकूण संख्या अंदाजे 1 हजार 149 आहे. प्रत्येक बटालियनमध्ये इंजिनीअर, तंत्रज्ञ, इलेक्ट्रिशियन, श्वान पथक आणि वैद्यकीय/पॅरामेडिक्ससह असे प्रत्येकी 45 जवान असतात. 




 


NDRF फोर्सची स्थापना कधी झाली?


आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 अंतर्गत धोकादायक आपत्ती परिस्थितीला विशेष प्रतिसाद देण्याच्या उद्देशाने 2006 मध्ये राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची स्थापना करण्यात आली. NDRF हे केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आखत्यारित येते. एनडीआरएफ फोर्स ही 16 बटालियनची एक फौज आहे. जी पॅरा-मिलिटरी लाइनवर आधारीत आहे. भारताच्या निमलष्करी दलांकडून प्रतिनियुक्तीवर व्यक्तींनी तयार केली जाते. NDRF चे घोषवाक्य हे 'आपदा सेवा सदैव' असे आहे. या घोषवाक्याचा अर्थ आपत्तीच्या वेळी सदैव सेवा हीच प्राथमिकता असा होतो.


अनुपम श्रीवास्तव हे महाराष्ट्र NDRF चे प्रमुख
  
महाराष्ट्र आणि गोवा ही राज्यं पाचव्या बटालियनच्या कार्यक्षेत्रात येतात. यामध्ये एकूण 18 तुकड्या आहेत. यापैकी मुंबईत 3, पुण्यात 14 तर नागपूरमध्ये 1 तुकडी आहे. सध्या सत्यनारायण प्रधान हे NDRFचे महासंचालक आहेत तर महाराष्ट्र एनडीआरएफचे प्रमुख हे अनुपम श्रीवास्तव आहेत.




 वेगवेगळ्या दलाच्या बटालियन


1) सशस्त्र सीमा दल (SSB)  दोन बटालियन


2)  सीमा सुरक्षा फोर्स (BSF) - तीन बटालियन


3) इंडो-तिब्बत सीमा पुलिस (ITBP)  - दोन  बटालियन


4) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा फोर्स (CISF) - दोन  बटालियन


5) केंद्रीय रिजर्व पुलिस फोर्स (CRPF) - तीन बटालियन


 


या 13 ठिकाणी ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या बटालियनच्या टीम 



1) बीएन एनडीआरएफ, गुवाहाटी, आसाम - बीएसएफ 


2) बीएन एनडीआरएफ, नदिया, पश्चिम बंगाल - बीएसएफ 


3) बीएन एनडीआरएफ, कटक ओडिशा - सीआईएसएफ 


4) बीएन एनडीआरएफ, वेल्लोर, तामिळनाडू- सीआईएसएफ 


5) बीएन एनडीआरएफ, पुणे, महाराष्ट्र - सीआरपीएफ 


6) बीएन एनडीआरएफ, वडोदरा, गुजरात - सीआरपीएफ 


7) बीएन एनडीआरएफ, गाजियाबाद, उत्तर प्रदेश - आईटीबीपी 


8) बीएन एनडीआरएफ, भटिंडा, पंजाब - आईटीबीपी 


9) बीएन एनडीआरएफ, पटना, बिहार - बीएसएफ


10) बीएन एनडीआरएफ, गुंटूर, आंध्र प्रदेश - सीआरपीएफ 


11) बीएन एनडीआरएफ, वाराणसी, उत्तर प्रदेश - एसएसबी 


12) बीएन एनडीआरएफ, ईटानगर, अरुणाचल प्रदेश - एसएसबी 


13) बीएन एनडीआरएफ, जम्मू आणि काश्मिर- आसाम रायफल




मागच्या काही वर्षातील एनडीआरएफची प्रमुख ऑपरेशन 



2015


2015 मध्ये एप्रिल महिन्यात नेपाळ आणि भारताच्या काही भागात भूंकप झाला होता. त्यावेळी एनडीआरएफच्या टीम भारत आणि नेपाळच्या काही भागांमध्ये गेल्या होत्या. तसेच नोव्हेंबर 2015 मध्ये चेन्नई आणि तामिळनाडूमध्ये काही भागात पूर आला होता. त्यावेळी तेथील हजारो नागरिकांना वाचवण्याचे काम NDRF च्या जवानांनी केलं होते.
 
2018-2019 


केरळमध्ये ऑगस्ट 2018 मध्ये आलेल्या पुराच्या वेळी NDRF च्या किमान 58 तुकड्यांची नियुक्ती करण्यात आली होती. कोणत्याही एका राज्यात NDRF ची उभारणी झाल्यापासून आतापर्यंतची सर्वाधिक तैनाती होती. यावेळी 194 लोकांचा जीव वाचवण्यात NDRF ला यश मिळालं होतं. 10,000 हून अधिक लोकांना बाहेर काढण्यात आले होते. 



2020


आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम इथे गॅस गळतीची घटना घडली होती. 7 मे 2020 ला ही घटना घडली होती. यावेळी देखील NDRF ची भूमिका महत्वाची होती. तसेच 2020 मध्ये पश्चिम बंगालमध्ये अम्फान चक्रीवादळ आले होते. या वादळातून देखील हजारो लोकांना वाचवण्याचे काम NDRF च्या जवानांनी केलं आहे.


2021


उत्तराखंडमध्ये हिमनद्यांचा उद्रेक झाला होता. त्यावेळी तिथे पूर आला होता. गी घटना 7 फेब्रुवारी 2021 मध्ये घडली होती. यावेळी NDRF च्या जवानांनी हजारो लोकांना बाहेर काढले होते.  
तसेच ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये यास चक्रीवादळ आलं होतं. यावेळी देखील NDRF च्या जवानांनी मोलाची कामगिरी बजावली होती.





NDRF मध्ये प्रवेश कसा मिळवायचा? 


एनडीआरएफमध्ये दाखल होण्यासाठी तुम्ही बीएसएफ सीआरपीएफ सिआयएसएफ आयटीबीपी आणि एसएसबी यांसारख्या पॅरामिलिटरीचे जवान असणे आवश्यक आहे. कारण यामध्ये  प्रतिनियुक्तीच्या माध्यमातून जवानांची नियुक्ती केली जाते. प्रतिनियुक्तीचा कालावधी सात ते नऊ वर्षं इतका असू शकतो. त्यांना 19 आठवड्यांचे आंतरराष्ट्रीय स्तराचं प्रशिक्षण दिलं जातं.


             
NDRF चे प्रशिक्षण


प्रथम, आपत्ती व्यवस्थापनाच्या मूलभूत गोष्टींमध्ये राज्य पोलीस कर्मचार्‍यांना प्रशिक्षित केले जाते. दुसरे म्हणजे, राज्य आपत्ती प्रतिसाद म्हणून त्यांच्या राज्य सशस्त्र पोलीस तुकड्यांमधून किमान एका बटालियनला प्रशिक्षित केले जाते. तसेच NDRF च्या धर्तीवर फोर्स SDRF दल कार्यरत असते.  पोलिस कर्मचार्‍यांव्यतिरिक्त, अग्निशमन सेवा, गृहरक्षक दल आणि नागरी संरक्षण यांच्या विद्यमान संसाधनांमधून SDRF ची स्थापना केली जाते. NDRF Bns आणि त्यांच्या प्रशिक्षण संस्था या राज्ये किंवा केंद्रशासित प्रदेशांना मदत करतील. 


दरम्यान, सध्या महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात ऑरेंज तर काही जिल्ह्यात रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर NDRF च्या 17  टीम तैनात करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र एनडीआरएफचे प्रमुख हे अनुपम श्रीवास्तव यांनी दिली आहे. यामध्ये 5 टीम मुंबईत तैनात करण्यात आल्या आहेत. तर  2 टीम कोल्हापूरमध्ये, 2 टीम रत्नागिरीत, 2 टीम ठाणे, 2 रायगडमध्ये. 2 टीम पालघरमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. तर प्रत्येकी 1 टीम सिंधुदुर्ग आणि सातारा जिल्ह्यात तैनात करण्यात आल्याचे अनुपम श्रीवास्तव यांनी सांगितले.


महत्त्वाच्या बातम्या: