मुंबई : सन 2047 पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) ही सध्याच्या आकारापेक्षा 13 पटींनी वाढून 40 ट्रिलियन डॉलरवर पोहोचेल असा विश्वास रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी (Mukesh Ambani)  यांनी व्यक्त केला आहे. पंडित दिनदयाळ एनर्जी युनिव्हर्सिटीच्या 10 व्या दिक्षांत समारोहाच्या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. क्लीन एनर्जी (clean energy revolution) आणि डिजिटलायझेशनच्या क्रांतीमुळे हे शक्य होईल असंही ते म्हणाले.


पंडित दीनदयाल एनर्जी युनिव्हर्सिटीच्या (Pandit Deendayal Energy University) 10 व्या दीक्षांत समारंभात बोलताना रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी म्हणाले की, "भारतीय अर्थव्यवस्था सध्या 3 ट्रिलियन डॉलर्सची आहे. सन 2047 पर्यंत त्याचा आकारमान सध्यापेक्षा 13 पटींनी वाढेल आणि ती 40 ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचेल आणि जगातील टॉप तीन अर्थव्यवस्थेमध्ये स्थान मिळवेल."


तीन क्रांती ठरणार गेम चेंजर 


मुकेश अंबानी पुढे म्हणाले की, "आतापासून 2047 सालापर्यंतचा मधला काळ, म्हणजे अमृत काळ, ज्यावेळी भारत आपल्या स्वातंत्र्याचा शतक महोत्सव साजरा करत असेल, त्यावेळी आर्थिक विकासाच्या मोठ्या आणि अगणित संधी प्राप्त होतील आणि भारतीय अर्थव्यवस्था आश्चर्यरित्या झेप घेईल. क्लीन एनर्जी रिव्होल्यूशन म्हणजे स्वच्छ ऊर्जा क्रांती, बायो एनर्जी रिव्होल्यूशन म्हणजे जैव-ऊर्जा क्रांती आणि डिजिटल रिव्होल्यूशन या तीन गेम चेंजिंग क्रांतींच्या माध्यमातून हे शक्य आहे. या तीन गोष्टींमुळे भारतीय अर्थव्यवस्थेत मोठा सकारात्मक बदल होईल."


स्वच्छ ऊर्जा क्रांती आणि जैव-ऊर्जा क्रांतीमुळे शाश्वत ऊर्जा निर्मिती होईल, तर डिजिटल क्रांती आपल्याला ऊर्जा कार्यक्षमतेने वापरण्यास सक्षम करेल असं मुकेश अंबानी म्हणाले. तिन्ही क्रांती एकत्रितपणे भारत आणि जगाला हवामान संकटापासून वाचवण्यास मदत करतील असंही ते म्हणाले. 


रिलायन्स उद्योग समूहाने तेलापासून ते टेलिकॉमपर्यंत सर्वच क्षेत्रं व्यापली आहेत. जिओमुळे भारतीय दूरसंचार क्रांतीला मोठा हातभार लागल्याचं चित्र आहे. जिओच्या मोफत व्हॉईस कॉल आणि स्वस्त डेटा ऑफरमुळे देशातील मोठ्या लोकसंख्येला या डिजिटल क्रांतीचा घटक होता आलं. 


गौतम अदानींचा विश्वास 


भारतीय अर्थव्यवस्था सध्या जगात पाचव्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था आहे. अमेरिका, चीन, जपान आणि जर्मनीच्या नंतर भारतीय अर्थव्यवस्थेचा क्रमांक लागतोय. गेल्याच आठवड्यात आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या गौतम अदानी यांनीही भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल आशादायी वक्तव्य केलं होतं. भारतातील वाढत्या मागणीमुळे आणि सामाजिक आणि आर्थिक सुधारणांमुळे 2050 पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था ही 30 ट्रिलियन डॉलर्सची होईल असं ते म्हणाले होते.