एक्स्प्लोर
तो मदत मागत राहिला, पण बायको-मुलाने प्राण सोडले
दुचाकी अपघातानंतर रस्त्याच्या मधोमध तो जखमी पत्नी आणि मुलाला मांडीवर घेऊन त्यांच्या जीवाची भीक मागत होता. पण त्याचं दुर्दैव हेच की येणाऱ्या जाणाऱ्या एकालाही त्याची मदत करावीशी वाटली नाही. अखेर त्याच्या बायको-मुलाने त्याच्या मांडीवरच प्राण सोडले.

होशंगबाद (मध्य प्रदेश) : दुचाकी अपघातानंतर रस्त्याच्या मधोमध तो जखमी पत्नी आणि मुलाला मांडीवर घेऊन त्यांच्या जीवाची भीक मागत होता. पण त्याचं दुर्दैव हेच की येणाऱ्या जाणाऱ्या एकालाही त्याची मदत करावीशी वाटली नाही. अखेर त्याच्या बायको-मुलाने त्याच्या मांडीवरच प्राण सोडले. मध्य प्रदेशच्या होशंगबाद जिल्ह्यातील एका अपघातानंतरचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मागून आलेल्या भरधाव ट्रकने त्याच्या दुचाकीला धडक दिली. अपघातात त्याची पत्नी अंजू आणि मुलगा गंभीर जखमी झाले. दोघांना उपचारांसाठी रुग्णालयात न्यावं, यासाठी तो रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनांकडे मदत मागत होता. दु्र्दैवाची गोष्ट म्हणजे एकानेही त्याची हाक ऐकली नाही. उलट त्याचा व्हिडिओ काढण्यात धन्यता मानणारे काही जण होते. व्हिडिओ सुरु असतानाच किमान 14 वाहनं गेली, मात्र त्यापैकी एकही जण थांबला नाही. सात जुलै रोजी मध्य प्रदेशातील डोंगरी भागात हा अपघात घडला. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. या घटनेनंतर पोलिसांनी सुप्रीम कोर्टाच्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन नागरिकांना केलं. अपघातग्रस्तांच्या मदतीला येणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला पोलिस त्रास देणार नाहीत, असं कोर्टाने म्हटलं आहे.
आणखी वाचा























