त्रिवेंद्रम: बिहारच्या दशरथ मांझीची कथा आज सर्वांनाच माहिती आहे. एका डोंगरामुळे आपल्या पत्नीचा मृत्यू झाल्याने, त्यांनी छन्नी आणि हतोड्याचे घाव घालून भला मोठा डोंगर फोडून रस्ता तयार केला होता. आता असाच भीमकाय पराक्रम केरळमधील एका दिव्यांग व्यक्तीने करुन माऊंटनमॅनच्या आठवणी ताज्या केल्या आहेत.चांगल्या रोजगाराच्या शोधासाठी या व्यक्तीनेही डोंगर फोडून त्यातून तब्बल 200 मीटरचा लांब रस्ता तयार केला आहे.

केरळमधील त्रिवेंद्रमच्या विलाप्पीशलमध्ये राहणारे 58 वर्षीय शशी यांचे आपल्या गावातून शहराला जोडणारा रस्ता तयार करण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून सतत प्रयत्न करत आहेत. यासाठी त्यांनीही दशरथ मांझी यांच्याप्रमाणे हातात कुदळ घेऊन डोंगर फोडत आहेत. शशी यांच्या या प्रयत्नांमध्ये त्यांच्यासमोरही अनेक आव्हाने होती.



वास्तविक, शशी तरुणपणापासून मजूरी करत होते. विहरीतून पाणी काढणे, झाडावरुन नारळ काढून त्यांची विक्री करुन त्यातून आपला उदरनिर्वाह चालवत. मात्र 18 वर्षापूर्वी झाडावरुन नारळ काढताना पडल्याने ते गंभीर जखमी झाले. या अपघातामुळे त्यांना कित्येक महिने अंथरुणाला खिळून राहावे लागलं, आणि त्यातच त्यांना अर्धंगवायूचा झटका आला.



यानंतर त्यांना चालण्यास त्रास होऊ लागल्यामुळे त्यांनी ग्रामपंचायतीकडे तीन चाकी वाहनाच्या मदतीची मागणी केली. तसेच शहराला जोडणारा एखादा रस्ता बनवण्याचीही मागणी केली. पण यापैकी त्यांची कोणतीही मागणी मान्य झाली नाही. यानंतर त्यांनी स्वत:च एकेदिवशी हातात कुदळ आणि फावडे अचलले आणि डोंगर फोडण्याच्या कामाला सुरुवात केली.

सलग दीड वर्षांपासून ते या कामात आहेत. या काळात ते दिवसातील सहा तास डोंगर फोडण्यासाठी घाम गाळतात. अखेर त्यांच्या या कठोर परिश्रमापुढे नियतीलाही गुडघे टेकावे लागले. सध्या शशी यांचे काम अंतिम टप्प्यात असून, पुढील महिन्यात त्यांचे परिश्रम पूर्ण होतील.

विशेष म्हणजे, शशी यांच्या प्रयत्नांना ग्रामपंचायतीनेही सलाम केला असून, आता त्यांना तीन चाकी वाहन देण्याचं वचन दिलं आहे. ज्यातून ते आता रोज शहरात जाऊन आपला रोजगाराचा प्रश्न मार्गी लावता येईल.



बिहारच्या गयामधील दशरथ मांझी यांनीही आपल्या गहलौर गावाला वजीरपूरशी जोडण्यासाठी डोंगर फोडून रस्ता तयार केला होता. नऊ वर्षापूर्वी कर्करोगाने त्यांचे निधन झाले. पण त्यापूर्वी त्यांनी आपल्या संघर्षाची कथा एबीपी न्यूजला सांगितली होती.