नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्यासमोर होणारी प्रेझेंटेशन्स शांतपणे ऐकून घेतात आणि नंतर त्यावर चांगली-वाईट प्रतिक्रिया देतात, असं म्हटलं जातं. मात्र मोदींनी नुकत्याच एका प्रेझेंटेशनमधून काढता पाय घेतल्याचं वृत्त समोर आलं आहे. सचिवांच्या एका टीमने केलेलं सादरीकरण पसंत न पडल्याने मोदींनी वॉक आऊट केल्याची बातमी 'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिली आहे.


शेती संबंधी विभागातील आठ सचिवांच्या टीमने आरोग्य, स्वच्छता आणि शहरी विकास या विषयावर एक सादरीकरण केलं. त्यावेळी आणखी मेहनत घेऊन पुन्हा प्रेझेंटेशन करण्याची सूचना मोदींनी दिली. पुढच्या वेळी चांगल्या कल्पना मांडण्याचं सांगत पंतप्रधान तिथून बाहेर पडले.

मोदी सहसा पूर्ण प्रेझेंटेशन ऐकून घेतात आणि त्यानंतर चर्चा करतात, त्यामुळे मोदींचं हे वर्तन अनपेक्षित असल्याचं 'टाइम्स'च्या वृत्तात म्हटलं आहे. अर्थमंत्री सादर करणाऱ्या बजेटसाठी महत्त्वाचे मुद्दे देण्याच्या सूचना सचिवांना देण्यात आल्या होत्या.

अर्थ मंत्रालयाने सर्वसामान्य जनतेकडूनही बजेटबाबत ट्विटरवर सूचना मागवल्या आहेत. 31 जानेवारीला केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार असून 1 फेब्रुवारीला बजेट सादर होणार आहे.