पुणे : 'देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे' या कविवर्य विंदा करंदीकरांच्या कवितेतील ओळी पुण्यातील एका महिलेने सार्थ ठरवल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी ज्या महिलेवर किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया झाली होती, त्या महिलेचं लिव्हर मरणोत्तर दान करण्यात आलं आहे.

एखाद्या रुग्णावर अवयव प्रत्यारोपण झालं असताना त्याने पुन्हा अवयवदान करण्याची ही देशातली पहिलीच, तर जगातली दुसरीच वेळ आहे. पुण्यातील 42 वर्षीय ब्रेन डेड महिलेचं लिव्हर आता एका 66 वर्षीय रुग्णाला दान करण्यात आलं आहे. दोन वर्षांपूर्वी किडनी प्रत्यारोपण झालेल्या महिलेचं लिव्हर दान करण्यासाठी फिट असल्याचं लक्षात आल्याने ही शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला.

एखाद्या रुग्णावर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्याला इम्युनोसप्रेसिव्ह ड्रग्ज दिली जातात. इम्युनोसप्रेसिव्ह ड्रग्ज दिल्याने प्रत्यारोपण केलेला अवयव शरीराशी मिळती-जुळती परिस्थिती निर्माण करतो. मात्र हे ड्रग्ज दीर्घकाळासाठी घेतले गेल्यास इतर अवयव प्रत्यारोपणासाठी अनफिट ठरतात. त्यामुळे भविष्यात 'ऑर्गन रेसिपिअंट'ने अवयवदान करण्याची शक्यता धुसर होते.

संबंधित महिलेच्या डोक्यात अंतर्गत रक्तस्राव झाल्याने तिला एक जानेवारी 2017 रोजी ब्रेनडेड घोषित करण्यात आलं होतं. गेल्या आठवड्यात ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर प्रत्यारोपण झालेले रुग्णही संभाव्य दाते होऊ शकतात, ही क्रांतीकारी शक्यता समोर येत आहे. त्यामुळे अवयव प्रत्यारोपणाच्या क्षेत्रात नवा अध्याय लिहिला गेला आहे.