Covid-19 Fear: कोरोना व्हायरसनं संपूर्ण जग ठप्प झालं होतं. कोरोना महामारी (COVID-19 ) आणि त्यामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे (Lockdown) जनजीवन काही काळासाठी ठप्प झालं होतं. अशातच या काळातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोरोनाच्या आजाराच्या भीतीनं आणि आरोग्याच्या इतर समस्यांच्या चिंतेमुळे तब्बल दोन वर्ष एका घरात आई आणि मुलीनं स्वतःला कोंडून घेतलं होतं. अखेर आंध्र प्रदेश पोलिसांनी मंगळवारी (20 डिसेंबर) कोय्युरू गावातून जबरदस्तीनं दोघींना रुग्णालयात दाखल केलं. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या कुटुंबातील मुख्य व्यक्ती त्यांना नेहमी जेवण आणून द्यायची. पण गेल्या आठवड्याभरापासून दोघी जेवणंही करत नव्हत्या. त्यामुळे कुटुंबप्रमुखाला नाईलाजानं आरोग्य अधिकाऱ्यांना घडल्या प्रकाराची माहिती द्यावी लागली. 


आरोग्य अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीनं आई आणि मुलीला जबरदस्तीनं शासकीय रुग्णालयात दाखल केल्याची माहिती त्यांच्या नातेवाइकांनी दिली आहे. महिलेच्या मुलीनं अधिकाऱ्यांना विचारलं की, "आम्हाला आमच्या घरात राहायचंय, तेव्हा तुम्हाला काय अडचण आहे?" अधिकारी आई आणि मुलीला घराबाहेर येऊन सहकार्य करण्यासाठी समजावण्याचा प्रयत्न करत होते. पण त्या घरातून बाहेर पडण्यास अजिबातच तयार नव्हत्या. तब्बल दोन वर्षांपासून त्यांनी स्वतःला घरात कोंडून घेतलं होतं." 


स्वतःला घरात कोंडून घेणाऱ्या महिलेच्या पतीनं दिलेल्या माहितीनुसार, "त्या दोघींना काळ्या जादूची खूप भीती वाटायची. त्यामुळे त्यांनी घरातून बाहेर पडणचं सोडून दिलं होतं. मी सातत्यानं विश्वासात घेऊन दोघांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण त्या दोघीही घरातून बाहेर पडायला तयारच नव्हत्या. त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, तर दोघीही चिडायच्या." पण यामुळे त्या दोघींनाही आरोग्याच्या समस्या उद्भवू लागल्या. त्यावेळीही त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण दोघीही ऐकतच नव्हत्या. मग नाईलाजानं आरोग्य अधिकाऱ्यांकडे धाव घ्यावी लागली."


काही महिन्यांपूर्वी समोर आलेली अशीच एक घटना 


काही महिन्यांपूर्वी आंध्र प्रदेशमध्ये एका शेजाऱ्याचा कोविड-19 मुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर एका कुटुंबातील तीन सदस्यांनी 15 महिने स्वतःला एका छोट्या घरात कोंडून घेतलं होतं. नातेवाईकांनी त्यांच्या प्रकृतीची माहिती दिल्यानंतर आंध्र प्रदेश पोलिसांनी समजूत काढून कुटुंबाला वाचवलं. त्याची दयनीय अवस्था पाहून पोलिसांनी त्याला तातडीनं शासकीय रुग्णालयात दाखल केलं होतं.