Massive coronavirus outbreak in China: चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा (Covid-19) कहर सुरू झाला आहे. कोरोनाच्या रुग्णांमध्ये इतकी वाढ झाली आहे की चीनच्या रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात  खाटा आणि औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. चीनसोबतच जपान आणि अमेरिकेतही कोरोनामुळे परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. चीन आणि जपानमध्ये निर्माण झालेली ही गंभीर परिस्थिती भारतासाठीही धोकादायक आहे.


चीन, जपान आणि अमिरिकेत कोरोनाच्या वाढते रुग्ण पाहता भारत सरकारही सतर्क झाले आहे. जपान, दक्षिण कोरिया, ब्राझील, चीन आणि अमेरिकेतील कोविड-19 प्रकरणांमध्ये नुकत्याच झालेल्या वाढीदरम्यान केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी बुधवारी कोरोना परिस्थितीचा आढावा घेतील. अधिकृत सूत्रांनी ही माहिती दिली.


आरोग्य मंत्रालयाने नवीन सूचना केल्या जारी 


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय परिस्थिती लक्षात घेता कोविड-19 परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आरोग्यमंत्री मनसुख मांडविया बुधवारी सकाळी 11 वाजता बैठक घेतील. याआधी मंगळवारी आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना विषाणूच्या नवीन स्वरूपाचे निरीक्षण करण्यासाठी संक्रमित आढळलेल्या नमुन्यांचे जिनोम सिक्वेंसिंग वाढविण्याचे आवाहन केले.


यातच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लिहिलेल्या पत्रात केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले की, अशा प्रकारच्या पद्धतीमुळे देशातील कोरोना विषाणूचे नवीन प्रकार वेळेवर शोधणे शक्य होईल. ते म्हणाले की, टेस्ट-निरीक्षण-उपचार-लसीकरण यांचे योग्य पद्धतीने पालन करण्याच्या धोरणावर लक्ष केंद्रित करून भारत कोरोनाव्हायरस संसर्गाचा प्रसार मर्यादित करण्यात सक्षम झाला आहे. तसेच प्रत्येक आठवड्याला सुमारे 1,200 प्रकरणे नोंदवली जात आहेत.




चीन, जपान, अमेरिकेत प्रकरणे वाढली


चीन, जपान, अमेरिकेत केसेस झपाट्याने वाढत आहेत. मंगळवारी चीनमध्ये सुमारे 3 हजार नवीन रुग्ण आढळले आहेत. जपानमध्ये मंगळवारी 1 लाख 85 हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळले असून 231 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अमेरिकेत गेल्या दिवशी 20 हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळले आणि 117 लोकांचा मृत्यू झाला.