New Delhi: देशातल्या एकूण वैमानिकांपैकी 15 टक्के महिला वैमानिक असल्याची माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी संसदेत दिली. जगातील इतर सर्व देशांच्या तुलनेत ही संख्या जास्त आहे. इतर देशांमध्ये केवळ 5 टक्केच महिला वैमानिक असल्याचे शिंदे म्हणाले. महिला सशक्तीकरणाच्या आणखी एका क्षेत्रात भारताने जगाला मागे टाकल्याचे ते म्हणाले.
केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी बुधवारी लोकसभेत सांगितले की, गेल्या 20-25 वर्षांत विमान वाहतूक उद्योगात बरेच बदल झाले आहेत. या क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होत आहे. महिला सक्षमीकरणाचे उदाहरण देताना ते म्हणाले की, इतर सर्व देशांमध्ये केवळ 5 टक्केचं महिला पायलट आहेत. परंतू, भारतात हे प्रमाण 15 टक्के आहे. केंद्रीय मंत्र्यांच्या वक्तव्याचा समाचार घेत लोकांनी ट्विटरवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आणि त्यांना अनेक प्रश्न देखील विचारले.
पूर्वी फक्त मोठ्या शहरांमध्येच विमानतळ होते. आज ते चित्र पूर्णपणे बदलले आहे. यामुळेच नागरी विमान वाहतूक उद्योग भारताच्या अर्थव्यवस्थेचा प्रमुख घटक बनला असल्याचे शिंदे म्हणाले. 2022-23 साठी नागरी उड्डयन मंत्रालयाच्या अनुदानाच्या मागणीला उत्तर देताना, सिंधिया सभागृहात बोलत होते. कोरोनाच्या संकटादरम्यान, भारतानं देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासात प्रगती केली आहे. नाशवंत खाद्यपदार्थांसाठी मालवाहू उड्डाणे येत्या काही वर्षांत 30 टक्क्यांपर्यंत वाढवून 133 नवीन उड्डाणे केली जातील असेह शिंदे म्हणाले. येत्या काही दिवसांत पायलट परवाना नवीन तंत्रज्ञानाने सुलभ केला जाईल. अधिक नोकऱ्या निर्माण करण्यासाठी आणि ड्रोन क्षेत्रावर लक्ष केंद्रित करण्यासाठी वैमानिकांसाठी 33 नवीन देशांतर्गत कार्गो टर्मिनल आणि 15 नवीन फ्लाइट ट्रेनिंग स्कूल तयार करण्याची सरकारची योजना असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, मंत्रालयाने आता 27 मार्च 2022 पासून नियोजित आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरु करण्यास परवानगी दिली आहे. मंगळवारी रात्री मंत्रालयाने हवाई उड्डाणसंदर्भातील कोरोना नियम शिथिल केले आहेत.
सध्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे दुसरे सत्र सुरु आहे. 14 मार्चपासून हे दुसरे सत्र झाले असून ते 8 एप्रिलला संपणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पूर्वार्ध 31 जानेवारीला सुरु झाला आणि 11 फेब्रुवारीला संपला होता.