India Weather Update : हवामान विभागाने 'गूड न्यूज' दिली आहे. संपूर्ण देशात मान्सूनचं (Monsoon) आगमन झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. हवामान विभागाने माहिती दिली आहे की, साधारणपणे संपूर्ण भारतात 8 जुलैपर्यंत मान्सून दाखल होतो. पण, यंदा 8 जुलै आधीच  संपूर्ण देशात मान्सूनचं आगमन झालं आहे. आता संपूर्ण देशात मान्सून पसरला आहे. भारतीय हवामान विभागाने संपूर्ण देशात मान्सून पसरल्याच रविवारी जाहीर केलं आहे. जुन महिन्यामध्ये 16 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये तुलनेने कमी पाऊस झाला मात्र, जुलैमध्ये पावसाचा जोर वाढला आहे.


संपूर्ण देशात मान्सूनचं आगमन


भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशात सध्या दक्षिण-पश्चिम मान्सून राजस्थान, हरियाणा आणि पंजाबमध्ये पोहोचला आहे. यासोबतच सामान्यपणे देशात मान्सून दाखल होण्याच्या सहा दिवस आधीच मान्सून देशभरात पसरला आहे. आयएमडीने पुढे सांगितलं आहे की, उत्तर प्रदेश आणि दक्षिण बिहार वगळा महाराष्ट्रासह इतर सर्व राज्यांमध्ये जुलै महिन्यात मान्सून सक्रिय राहणार आहे. जुलै महिन्यात मान्सून सामान्य राहण्याची अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे.






कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट


महाराष्ट्रातही जुलै महिन्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातील काही भागांत आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई, पुणे, नाशिक कोल्हापूरसह राज्यभरात रविवारी संततधार पाहायला मिळाली. हवामान विभागाने आज कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात असून या भागात मुसळधार पाऊल पडण्याचा अंदाज आहे.






जुलै महिन्यात पावसाचा जोर वाढणार


जुलै महिन्याच्या सुरुवातीलपासूनच पावसाचा जोर वाढल्याने सर्वत्र तापमानात गारवा निर्माण झाला आहे. देशभरात सर्वत्र सामान्य तापमान पाच डिग्री सेल्सिअस आणि काही भागात त्याहूनही अधिक खाली घसरलं आहे.