मुंबई : कोणत्याही क्षणी मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता आहे. मान्सूनचे सर्व निकष पूर्ण झाल्याची माहिती स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने दिली आहे. 5 जूनपासून केरळ, कर्नाटकचा किनारी भाग आणि लक्षद्वीपमध्ये काही प्रमाणात पावसाला सुरुवात झाली. मात्र मान्सूनची अधिकृत घोषणा अद्याप हवामान विभागाने केलेली नाही.

मान्सूनच्या आगमनासाठी ओ एल आर, हवेची स्थिती आणि क्षेत्र आणि पाऊस हे आवश्यक निकष आहेत. सध्या हे निकष पूर्ण झाले आहेत, असं स्कायमेटने सांगितलं आहे.

सुरुवातीला मान्सून 5 दिवस उशिराने म्हणजेच 6 जून रोजी केरळमध्ये दाखल होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. पण त्यात आणखी दोन दिवस उशीर झाला आहे. मान्सून पहिल्यांदा केरळच्या समुद्रकिनारी वर्दी देतो आणि त्यानंतर भारताच्या इतर भागांमध्ये मान्सूनचं आगमन होतं. यानंतर पुढील 45 दिवस देशभरात मान्सूनचा पाऊस कोसळतो.

येत्या 2 ते 3 दिवसात मान्सून महाराष्ट्रातही दाखल होणार आहे. पावसाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजाला काहीसा दिलासा मिळणार आहे. दरम्यान, आधीच दुष्काळ त्यात मान्सून लांबणीवर पडल्याने शेती क्षेत्रावर परिणाम होण्याची शक्यता आहे. देशभरात यंदा जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.