नवी दिल्ली : शिवसेनेला चाणक्यनीती शिकवल्यानंतर प्रशांत किशोर आता दीदींच्या मदतीसाठी सरसावले आहेत.  निवडणूक प्रचार रणनीतीकार अशी ख्याती असलेल्या प्रशांत किशोर यांनी कोलकात्यात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. दोन तासांच्या प्रदीर्घ चर्चेनंतर प्रशांत किशोर ममता बॅनर्जींसाठी काम करणार असल्यावर शिक्कामोर्तब झालं.


दोन वर्षांनी प. बंगालमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. लोकसभा निवडणुकीत तृणमूलला 22, तर भाजपला 18 जागा मिळाल्या होत्या. त्याचप्रमाणे निवडणूक काळात पश्चिम बंगालमध्ये दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये खडाखडी झाल्यानंतर निवडणूक आयोगाला प्रचार कालावधी कमी करण्याचा अभूतपूर्व निर्णय घ्यावा लागला होता.

पश्चिम बंगालमध्ये भाजपचा वारु चौफेर उधळत असल्यामुळे ममता बॅनर्जींच्या मनात धास्ती आहे. घट्ट पाय रोवू पाहणाऱ्या भाजपला पश्चिम बंगालमधून मुळासकट उपटून टाकण्याच्या इराद्याने दीदींनी प्रशांत किशोर यांच्याशी संपर्क साधला. प्रशांत किशोर आता ममता दीदींना विजयाचा कानमंत्र देतील. भाजपशी दोन हात करण्यासाठी तृणमूलच्या कार्यकर्त्यांना ते प्रचाराचा फंडा सांगतील.


पुढच्या महिन्यापासून 'मिशन बंगाल' सुरु करत असल्याचं प्रशांत किशोर यांनी 'एबीपी न्यूज'शी बोलताना सांगितलं. इंडियन पॉलिटिकल अॅक्शन कमिटी या त्यांच्या संस्थेने होमवर्कही सुरु केला आहे. गेल्या दोन वर्षांपासून प्रशांत किशोर जगन मोहन रेड्डी यांच्यासाठी काम करत होते.

प्रशांत किशोर यांची कारकीर्द

निवडणुकीत आपल्या आगळ्यावेगळ्या आणि परिणामकारक प्रचार मोहिमेसाठी ओळखल्या जाणाऱ्या प्रशांत किशोर यांनी देशभरातील विविध पक्षांच्या नेत्यांसाठी काम केलं आहे.

प्रशांत किशोर यांनी 2014 च्या लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान नरेंद्र मोदींसाठी काम केलं. ‘चाय पे चर्चा’ सारखा हिट कार्यक्रम असो की ‘अब की बार...’ सारख्या घोषणा या प्रशांत किशोर यांनी आखलेल्या रणनीतीचाच भाग होत्या.

2014 साली लोकसभा निवडणुकीत भाजपसाठी निवडणूक रणनितीकार म्हणून काम केल्यानंतर प्रशांत किशोर हे नितीश कुमार यांच्या संपर्कात आले.

बिहार विधानसभा निवडणुकीत प्रशांत किशोर यांनी नितीश कुमार यांना साथ दिली. नितीश कुमार आणि लालूप्रसाद यादव एकत्र येण्यातही प्रशांत यांचा मोठा वाटा होता.

शिवसेनेची 'चाणक्य'नीती, प्रशांत किशोर यांच्याकडे प्रचाराची धुरा

2015 साली बिहारमधील विधानसभा निवडणुकीत त्यांनी जेडीयूसाठी रणनिती आखली. 'बिहार में बाहर हो, नितीश कुमार हो' यासारख्या घोषणा प्रशांत किशोर यांचीच कल्पना आहे.

पंजाब आणि उत्तर प्रदेश विधानसभांच्या निवडणुकांसाठी प्रशांत किशोर यांनी राहुल गांधी यांच्यासोबत काम केलं होतं.

16 सप्टेंबर 2018 रोजी निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी नितीश कुमार यांच्या जनता दल यूनायटेड या पक्षात प्रवेश केला.

नुकत्याच झालेल्या आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत वायएसआर काँग्रेसला मिळालेल्या घवघवीत यशातून याची चुणूक दिसली. त्यामुळे तृणमूल काँग्रेसची सुकलेली पानं पुन्हा फुलणार का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
संबंधित बातम्या :

प्रशांत किशोर जेडीयूच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी