मान्सून अपेक्षेपेक्षा चार दिवस आधीच केरळमध्ये दाखल होईल, असा स्काटमेटचा अंदाज आहे. केरळमध्ये मान्सून साधारणत: एक जूनला दाखल होतो. मात्र यंदा तो चार दिवस आधीच केरळमध्ये पोहोचणार आहे. यंदाचा मान्सून 100 टक्के सामान्य राहणार असल्याचा अंदाज 4 एप्रिल रोजी स्कायमेटने व्यक्त केला होता.
इशान्य भारतात पूर्व मान्सूनची हजेरी
इशान्य भारतात पूर्व मान्सून दाखल झाला आहे. पूर्व मान्सून 13 पासून दाखल होईल, असा स्कायमेटचा अंदाज होता. त्यानुसार देशातील विविध भागात पूर्व मान्सून दाखल झाला आहे.
यंदा पाऊसमान कसं असेल?
भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) पाऊस सामान्य राहील, अशी शक्यता व्यक्त केली होती. यंदा पाऊसमान कमी राहण्याची शक्यता कमीच असल्याचं आयएमडीने म्हटलं आहे. पावसाचं प्रमाण सामान्य राहण्याची शक्यता साधारणत: 42 टक्के असेल, असं हवामान खात्याने म्हटलं आहे. तर पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता 12 टक्के असेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.
लवकरच उकाड्यापासून दिलासा
दरम्यान, पारा 47 अंशांवर पोहोचला आहे. विदर्भातील चंद्रपुरात 47 डिग्री तापमानाची नोंद करण्यात आली होती. त्यामुळे उकाड्याने त्रस्त झालेले नागरिक पावसाची वाट पाहत आहेत. तर मानसूनच्या आगमनाची चाहूल लागताच बळीराजाचीही लगभग सुरु होणार आहे.
मान्सून महाराष्ट्रात कधी?
मान्सून केरळात दाखल झाल्यानंतर पुढील 24 तासात त्याची वाटचाल दक्षिण अरबी समुद्र, मालदीव-लक्षद्विप बेटांचा परिसर, केरळचा बराच परिसर, तामिळनाडूचा काही भाग आणि बंगालची खाडीचा परिसरात होते. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रात 2 ते 3 जून रोजी पूर्व मोसमी पाऊस होण्याचा अंदाज गेल्यावर्षी वर्तवण्यात आला होता. त्यामुळे यावर्षी मान्सून राज्यात कधी दाखल होतो, ते पाहणं महत्त्वाचं असेल.
केरळात मान्सून आलाय ते कसं कळतं ?
( मान्सूनच्या आगमनाची वर्दी अशी मिळते…) (मान्सूनच्या आगमनाचे निकष..)
निकष पहिला –
पाऊस (RAINFALL) – केरळ आणि कर्नाटक किनारपट्टीवर 14 केंद्र आहेत, त्यातल्या 60 टक्के म्हणजे 8 ते 9 केंद्रावर सलग दोन दिवस किंवा दोन दिवसांपेक्षा जास्त दिवस 2.5 मिलिमीटर पावसाची नोंद झाली तर मान्सूनची वर्दी समजली जाते, दुसऱ्या दिवशी हवामान विभाग मान्सून भारतभूमीवर आला अशी घोषणा करतं, मात्र त्यासाठी आणखी दोन निकष पाहिले जातात.
निकष दुसरा –
वाऱ्याचं क्षेत्र (WIND FIELD) – पश्चिमी वारे ठराविक वेगाने (ताशी 25 ते 35 किलोमीटर) आणि ठराविक दाबाने (600 हेक्टोपास्कल) वाहत असेल तर मान्सूनच्या आगमनाला पुष्टी मिळते
निकष तिसरा –
बहिर्गामी दीर्घतरंग प्रारण अर्थात Outgoing Longwave Radiation (OLR) – थोडक्यात उपग्रहांच्या आधारे त्या ठिकाणी ठराविक उर्जा – उष्णता आहे हे कळणं महत्वाचं. म्हणजे पावसासोबत वारे आणि त्या भागातील उर्जेची स्थिती हे तिनही निकष जुळून आले तरच मान्सूनच्या आगमनाची घोषणा केली जाते.
यासोबतच मान्सूनच्या प्रगतीमध्ये महत्वाचा घटक म्हणजे मान्सूनची उत्तरी सीमा (Northern Limit of Monsoon (NLM) http://www.imd.gov.in/section/nhac/dynamic/Monsoon_frame.htm)
केरळात 1 जूनला आलेला मान्सून देशाच्या उत्तरेच्या बाजुने कसा पुढे सरकतो यावर त्याची प्रगती ठरते, मान्सूनचा पुर्वेकडील भाग ज्यावेळी ईशान्य भारतातच असतो त्यावेळी म्हणजे 10 जूनपर्यंत मान्सूनची उत्तरी सीमा पाऊस घेऊन मुंबईत पोहोचलेली असते, दिल्लीत साधारण 29 जूनला पोहोचलेल्या मान्सूनचा वेग मंदावतो आणि पश्चिम राजस्थानपर्यंत पोहोचायला मान्सून तब्बल 12 दिवस घेतो.
1 जूनला केरळात दाखल झालेल्या मान्सूनने 15 जुलैपर्यंत सर्व देश व्यापून टाकलेला असतो.
संबंधित बातमी :