26/11 च्या हल्ल्यामागे पाकचा हात, नवाज शरीफ यांची कबुली
एबीपी माझा वेब टीम | 13 May 2018 09:31 AM (IST)
26/11 च्या हल्ल्यानंतर वेळीवेळी पाकिस्तानवर आरोप झाले. मात्र प्रत्येकवेळी पाकिस्तानने कांगावा करत सर्व आरोप फेटाळून लावले.
इस्लामाबाद : मुंबईवर झालेल्या 26/11च्या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याची पहिल्यांदाच जाहीर कबुली खुद्द पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी दिली. पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली. विशेष म्हणजे, 26/11 च्या हल्ल्यानंतर वेळीवेळी पाकिस्तानवर आरोप झाले. मात्र प्रत्येकवेळी पाकिस्तानने कांगावा करत सर्व आरोप फेटाळून लावले. मात्र शरीफ यांच्या रुपाने पाकिस्तानच्या खोटारडेपणाचा बुरखा पुन्हा एकदा फाटला. पनामा पेपर्सप्रकरणी नवाज शरीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. यानंतर त्यांना पंतप्रधानपदावरुन हटवण्यात आले. मुंबईवरील सर्वात मोठा हल्ला 26/11 हल्ल्यात 166 निरपराध नागरिकांचा बळी गेला होता आणि शेकडो नागरिक जखमी झाले होते. तर हल्लेखोर दहशतवाद्यांपैकी जीवंत पकडलेल्या अजमल आमीर कसाबला फासावर लटकवण्यात आले. देशाच्या आर्थिक राजधानीवर झालेल्या हल्ल्यात तुकाराम ओंबळे, महाराष्ट्र एटीएसचे तत्कालीन प्रमुख हेमंत करकरे, अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक कामटे, एनकाऊंटर स्पेशालिस्ट विजय साळसकर, मेजर संदीप उन्नीकृष्णन यांना वीरमरण आलं होतं.