Monsoon Session : 18 जुलैपासून सुरु झालेलं संसदेच पावसाळी अधिवेशन (Monsoon Session ) सोमवारी (8 ऑगस्ट) अनिश्चित काळासाठी संस्थगित करण्यात आलं. या अधिवेशनात 22 दिवसांच्या कालावधीत 16 बैठका झाल्या आहे. 18 जुलै ते 12 ऑगस्ट या कालावधीत एकूण 18 बैठका घेण्याचे नियोजित होते. मात्र, अत्यावश्यक शासकीय कामकाज पूर्ण झाल्यामुळं तसेच आगामी दोन राजपत्रित आणि सरकारी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर सदस्यांची मागणी लक्षात घेऊन अधिवेशनाचा कालावधी कमी करण्यात आला आहे. लोकसभेत 48 टक्के तर राज्यसभेत 44 टक्के कामकाज झाले.
या अधिवेशनादरम्यान, विविध महत्वाची विधेयके मंजूर करण्यात आली. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये पाच विधेयके मंजूर करण्यात आली आहेत.
महत्त्वाची विधेयके
कौटुंबिक न्यायालये (सुधारणा) विधेयक, 2022
सामूहिक विनाशाची शस्त्रे आणि त्यांची वितरण प्रणाली (बेकायदेशीर कारवायांना प्रतिबंध) दुरुस्ती विधेयक, 2022,
भारतीय अंटार्क्टिका विधेयक, 2022
राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य सेवन विरोधी विधेयक, 2021
केंद्रीय विद्यापीठे (दुरुस्ती) विधेयक, 2022
लोकसभेत, नियम 193 अन्वये महागाईवर एक अल्पकालीन चर्चा झाली. लोकसभेत भारतातील खेळांना प्रोत्साहन देण्याची गरज आणि त्यासंदर्भात सरकारनं उचललेली पावले यावर गौरव गोगोई यांनी 31 मार्च 2022 रोजी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर पुढील चर्चा घेण्यात आली. मात्र, ती पुन्हा अनिर्णायक राहिली. राज्यसभेत, अत्यावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींबाबत नियम 176 अंतर्गत एक अल्पकालीन चर्चा झाली.
चार दिवस आधीच अधिवेशनाची सांगता
संसदेचे पावसाळी अधिवेशन 18 जुलैपासून सुरु झालं होतं. हेअधिवेशन 12 ऑगस्टपर्यंत चालणार होते. मात्र, चार दिवस आधीत अधिवशनाची सांगता झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा कालखंड आहे. येणाऱ्या 25 वर्षांनी देश शताब्दी साजरी करेल. या काळात आपल्याला नव्या उंची गाठायची आहे. यासाठी आपल्याला संकल्प करायचे असल्याचे म्हटले होते.
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना निरोप
राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा सोमवारी शेवटचा दिवस होता. जगदीप धनखड हे आता नवीन उपराष्ट्रपती असणार आहेत. 11 ऑगस्ट रोजी उपराष्ट्रपती म्हणून पद आणि गोपनीयतेची धनखड शपथ घेणार आहेत.