Bihar Politics: जेडीयूचे (JDU) माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री आरसीपी सिंह (R P Singh) यांनी शनिवारी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिल्यानंतर बिहारच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. यावरून भाजप (BJP) आणि जेडीयूच्या नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक वाद सुरु आहेत. यामुळेच बिहारमध्ये भाजप आणि जेडीयूची युती तुटण्याची चिन्हे असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्यांच्या घरी आज बैठक बोलावली आहे. आज सकाळी 11 वाजता ही बैठक होणार असून बिहारमधील जेडीयू आणि भाजपच्या युतीवर त्यावर चर्चा होणार असल्याची माहिती आहे. 


नितीश कुमार आज मोठा निर्णय घेण्याची शक्यता


बिहारमधील युतीच्या भवितव्याबाबत मुख्यमंत्री नितीश कुमार आज मोठा निर्णय घेऊ शकतात. त्यांनी पक्षातील महत्वाच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. जेडीयूची भूमिका पाहता भाजप अजूनही वेट अँड वॉचच्या भूमिकेत दिसत आहे. भाजपच्या जवळच्या सूत्रांनी असं सांगितलं आहे की, भाजप सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. भाजपकडून नितीश कुमार यांचा पक्ष फोडण्याचा कोणताही प्रयत्न केला जाणार नाही. तसेच भाजप आपल्या बाजूने सरकार पाडण्यासाठी कोणतेही प्रयत्न करणार नाही असं भाजपच्या नेत्यांनी स्पष्ट केलं आहे.


"पक्ष जो काही निर्णय घेईल, तो जेडीयूच्या प्रत्येक सदस्याला मान्य असेल"


जेडीयूने आपल्या सर्व आमदारांना सोमवारी संध्याकाळपर्यंत पाटण्यात हजर राहण्याचे आदेश दिले होते. या बैठकीबाबत जेडीयूचे आमदार गोपाल मंडल यांनी काल सांगितले की, बैठकीत काय होईल हे तूर्त सांगता येणार नाही. पण काहीतरी मोठे घडणार आहे. आम्ही आता युतीत आहोत. पण यात काही बदल होणार की नाही ते पुढे कळेल.'' यातच पक्षाचे प्रवक्ते केसी त्यागी म्हणाले की, नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली पक्ष जो काही निर्णय घेईल, तो जेडीयूच्या प्रत्येक सदस्याला मान्य असेल.


पंतप्रधानांच्या बैठकीतही नितीश कुमार अनुपस्थित


रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या NITI आयोगाच्या बैठकीतही नितीश कुमार सहभागी झाले नव्हते. तसेच माजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या निरोप समारंभाला आणि नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथविधी समारंभाला ते उपस्थित राहिले नव्हते. दरम्यान, जेडीयूने आपल्या कोणत्याही प्रतिनिधीला केंद्रीय मंत्रिमंडळात सामील होण्यासाठी पाठवणार नसल्याचे जाहीर केले. आरसीपी सिंग हे जेडीयूच्या कोट्यातील मंत्री होते, त्यांना राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर राजीनामा द्यावा लागला आणि त्यांना दुसरी संधी मिळाली नाही. एनडीएच्या या दोन पक्षांमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे या घटनांवरून दिसून येते.