नवी दिल्ली: नोटाबंदीच्या निर्णयानंतर सध्या देशभरात सर्वत्र पेटीएमचा बोलबाला आहे. कॅशलेस व्यवहारासाठी दुकानदार आणि ग्राहक सर्वच पेटीएमचा वापर करत आहेत. त्यातच आता पेटीएमचा वापर करणाऱ्या व्यवसायिकांना कंपनीने आनंदाची बातमी दिली आहे. कारण आता प्रत्येक महिन्याला पेटीएम वापरणारा व्यवसायिक आपल्या मोबाईल वॉलेटच्या अकाऊंटमधून 25 हजारांऐवजी 50 हजारापर्यंतची रक्कम ट्रान्सफर करता येणार आहेत.


यापूर्वी पेटीएमच्या वॉलेटमधून महिन्याला 25 हजार रुपयेच ट्रान्सफर करण्याची मर्यादा होती. त्यामुळे ज्यांचा व्यवसाय यापेक्षा अधिक आहे, त्या पेटीएम धारक व्यवसायिकांची पंचाईत होत होती. पण आता ही वाढवल्याने व्यवसायिकांना दिलासा मिळणार आहे. शिवाय, व्यवसायिकांनी विक्री करुन कमावलेले पैसेही थेट त्या विक्रेत्याच्या बँक खात्यामध्ये 24 तासात जमा होणार आहेत. यासाठी पेटीएमचा वापर करणाऱ्या दुकानदाराला स्वत:ला मर्चेंट असल्याचे पुरावे सादर करावे लागणार आहेत.

पेटीएमचे अधिकारी दीपक एबिट यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुकानदार आणि मर्चेंटना नवीन उपाय उपलब्ध करुन दिले असून, संबंधित यूजर्सला सर्व माहिती द्यावी लागणार आहे. यानंतर त्याची मर्यादा वाढवली जाऊन ती 50 हजार प्रति महिना करण्यात येणार आहे. शिवाय संबंधित दुकानदाराने विक्रीच्या माध्यमातून मिळवलेले पैसे 24 तासानंतर त्याच्या बँक खात्यावर जमा होतील, अशी व्यवस्थाही केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

या व्यतिरिक्त ज्यांची उलाढाल 50 हजारापेक्षा अधिक असेल, त्यांना वेगळी प्रक्रीया करुन ती मर्यादा वाढवून घ्यावी लागणार आहे. त्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. यानंतरच संबंधित व्यवसायिकाची मर्यादा वाढवली जाईल.

सध्या पेटीएमचा वापर करणाऱ्या अनेक व्यवसायिकांचा व्यवसाय 25 हजार रुपयापर्यंत येऊन ठेपला आहे. त्यामुळे ही मर्यादा 50 हजारापर्यंत वाढवून 95 टक्के व्यवसायिकांना ग्राहक बनवण्याचा कंपनीचा मानस आहे, तसेच इतर पाच टक्क्यांसाठी वेगळ्या उपाय योजना करण्यात येणार असल्याचे दीपक एबिट यांनी सांगितले.