पाकिस्तानातून सर्वात मोठी नोट चलनातून बाद
काळ्या पैशाचा बंदोबस्त करण्यासाठी पाकिस्ताननेही भारताकडून धडा घेतल्याचं चित्र आहे. पाकिस्तानच्या संसदेत 5000 रुपयांची नोट चलनातून हद्दपार करण्याचा प्रस्ताव बहुमताने पारित करण्यात आला आहे.
पाकिस्तानमध्ये काळा पैसा रोखण्यासाठी 5000 रुपयांची नोट बंद करण्यात येणार आहे. भारताने नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर दीड महिन्यातच पाकिस्तानने हे पाऊल उचललं आहे. मुस्लीम लीगचे उस्मान सैफुल्लाह खान यांनी हा प्रस्ताव मांडला, जो बहुमताने पारित करण्यात आला.
भारतानंतर पाकिस्तानातही आता नोटाबंदीचा निर्णय
पाकिस्तानमध्ये 5 हजारच्या नोटांची संख्या एकूण चलनाच्या 30 टक्के एवढी आहे. स्टेट बँक ऑफ पाकिस्तानच्या विरोधानंतरही जनरल परवेज मुशर्रफ सरकारने 5 हजार रुपयांची नोट चलनात आणली होती.
ऑस्ट्रेलियातही नोटाबंदीची शक्यता
भारतानंतर ऑस्ट्रेलियादेखील लवकरच नोटाबंदी करण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलिया सरकारने 100 ऑस्ट्रेलियन डॉलरची नोट रद्द करण्यासाठी समिक्षा सुरु केली आहे. ही नोट बंद केल्यास काळा पैसा बाहेर काढता येईल, तसेच गैरव्यवहार थांबतील, असं ऑस्ट्रेलिया सरकारचं म्हणणं आहे.
मात्र ऑस्ट्रेलियाच्या रिझर्व बँकेने या निर्णयाला विरोध केला आहे. या नोटांमुळे गैरव्यवहार होत असल्याचा कोणताही पुरावा नाही, असं ऑस्ट्रेलियाच्या रिझर्व बँकेने स्पष्ट केलं आहे.
ऑस्ट्रेलियन गुन्हे आयोगाच्या म्हणण्यानुसार गैरव्यवहारासाठी 100 डॉलर नोटेपेक्षा सर्वात जास्त उपयोग 50 डॉलरच्या नोटेचा केला जातो. ऑस्ट्रेलियात सध्या 50 आणि 100 डॉलर नोटांची संख्या एकूण चलनाच्या 66 टक्के एवढी आहे.
व्हेनेझुएलामध्येही नोटाबंदी
व्हेनेझुएला सरकारने 12 डिसेंबर रोजी 100 बोलिवरची नोट चलनातून हद्दपार करण्याचा निर्णय जाहीर केला. काळा पैसा बाहेर काढण्यासाठी आणि बनावट नोटा हद्दपार करण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतींनी म्हटलं आहे.
व्हेनेझुएलात नोटाबंदीने हाहाकार, आठवड्याभरात निर्णय मागे
दरम्यान व्हेनेझुएलामध्ये या निर्णयामुळे आर्थिक संकट असल्याचं चित्र असून महागाई दरही वाढला आहे. व्हेनेझुएलामध्ये सध्या एकूण चलनाच्या 50 टक्के एवढ्या 100 बोलिवरच्या नोटा आहेत.
व्हेनेझुएलामध्ये नव्या नोटांचा पुरवठा न झाल्यामुळे सरकारने जुन्या नोटा स्वीकारण्यासाठी 2 जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. नोटाबंदीनंतर व्हेनेझुएलामध्ये अनेक हिंसक घटनाही घडल्या.
भारत आणि इतर देशांच्या नोटाबंदीची तुलना
लोकसंख्येनुसार भारत या देशांपेक्षा सर्वात मोठा देश आहे. भारतात 130 कोटी लोकसंख्या आहे, तर 500 आणि एक हजारच्या एकूण नोटा 86 टक्के एवढ्या आहेत. तर पाकिस्तानची लोकसंख्या 20 कोटी आहे, तर बंद करण्यात येणाऱ्या नोटांची संख्या एकूण चलनाच्या 30 टक्के आहे.
व्हेनेझुएलाची लोकसंख्या 3 कोटी आहे. तर तिथे बंद करण्यात आलेल्या नोटांची संख्या 50 टक्के आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाची लोकसंख्या 2.3 कोटी आहे, तर प्रस्तावितपणे बंद करण्यात येणाऱ्या नोटांची संख्या 66 टक्के आहे.